चोरट्यांना नागपुरात सिनेस्टाईल अटक; कारची काच फोडून माल लंपास करणारी टोळी गवसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:49 AM2018-01-10T11:49:27+5:302018-01-10T11:50:58+5:30
कारच्या काचा फोडून आतमधील मौल्यवान चीजवस्तू आणि रोकड असलेली बॅग पळविणारी टोळी सीताबर्डी पोलिसांनी सिनेस्टाईल पकडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारच्या काचा फोडून आतमधील मौल्यवान चीजवस्तू आणि रोकड असलेली बॅग पळविणारी टोळी सीताबर्डी पोलिसांनी सिनेस्टाईल पकडली. तिघांच्या या टोळीत एक भोपाळमधील अट्टल चोरटा असून, एका आॅटोचालकासह दोघे नागपुरातील गुन्हेगार आहेत. या टोळीकडून १० गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह ६ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश ओला यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र बोरावके आणि सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनीदेखील या टोळीच्या गुन्हेगारीचा आलेख पत्रकारांसमोर मांडला.
जितेंद्र रतन रामटेके (रा. पचंशीलनगर, हिंगणा रोड, नागपूर), मोहम्मद सारिक मोहम्मद युनूस (वय २६, रा. गंजीपेठ, गणेशपेठ) आणि गंगाप्रसाद भवरजी वर्मा (वय ३९, रा. टिल्लाखेडी, जि. भोपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, आॅटोचालक रामटेके हा या टोळीचा म्होरक्या आहे.
भोपाळ जिल्ह्यातील रहिवासी वर्मा हा फूटपाथवर राहतो. फूटपाथवर झोपणाऱ्या व्यक्तींच्या खिशातील पैसे आणि मौल्यवान साहित्य तो चोरतो. नऊ महिन्यांपूर्वी त्याला चोरी करताना आॅटोचालक रामटेकेने रंगेहात पकडले. चोरीतील अर्धा हिस्सा रामटेकेने त्यावेळी त्याच्याकडून मागून घेतला. त्यानंतर वर्माची चोरीची पद्धत पाहून रामटेकेही त्याच्यासोबत चोऱ्या करू लागला. लग्नसमारंभ, रिसेप्शन अथवा दुसऱ्या कोणत्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणारी मंडळी आपली कार पार्किंगमध्ये जागा नसल्याने दुसऱ्या ठिकाणी दूर उभी करतात. ते हेरून आरोपी रामटेके कारच्या बाजूला आपला आॅटो उभा करायचा. वर्मा लगेच कारची काच फोडून आॅटोच्या आडून कारमधील मौल्यवान चीजवस्तू आणि बॅग काढायचा अन् हे दोघे पळून जायचे. चोरीचा माल रामटेके गंजीपेठमधील मोहम्मद सारिकला विकायचा. एप्रिल महिन्यांपासून शहरात अशा घटना अचानक वाढल्याने पोलीस दलात अस्वस्थता निर्माण झाली होती. सीताबर्डी पोलिसांकडे कारची काच फोडून रोख आणि दागिने लंपास केल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे नोव्हेंबर २०१७ पासून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांच्या नेतृत्वात दोन पोलीस पथके या टोळीचा छडा लावण्यासाठी नियुक्त करण्यात आली.
या पथकाने गेल्या तीन महिन्यांमध्ये ठिकठिकाणी सापळे लावले. मात्र, ही टोळी हाती लागत नव्हती. दुसरीकडे गुन्हे सुरूच होते. १७ डिसेंबरला प्रशांत नारायण आसकर यांच्या कारमधून अशाच प्रकारे आरोपींनी सात हजारांची रोकड असलेली बॅग लंपास केली होती. सीताबर्डी ठाण्यात त्याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी नव्याने व्यूहरचना केली. ६ जानेवारीला गणेश टेकडी मार्गावर रस्त्याच्या बाजूला पोलिसांनी एक कार उभी केली. कारमध्ये मोठी बॅग होती. ते पाहून एक आॅटोचालक कारच्या आजूबाजूला रेंगाळत असल्याचे बाजूला दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या लक्षात आले. काही वेळातच आरोपी रामटेकेने आॅटो बाजूला उभा करून कारची काच फोडली. त्याचवेळी तिथे असलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला जेरबंद केले.
त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली. या तिघांनी नंतर एकूण १४ ठिकाणच्या गुन्ह्यांची कुबली दिली. त्यातील १० गुन्हे सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. या गुन्ह्यात चोरलेल्या साहित्यांपैकी पोलिसांनी ७२.५ ग्राम सोन्याचे दागिने, २ लाख, ८४ हजार किमतीचे २१ मोबाईल, १ लाख, ६६ हजार, ५०० रुपये किमतीचे सात लॅपटॉप, नोट पॅड आणि पर्स तसेच आॅटो, वेगवेगळ्या बॅगसह एकूण ६ लाख, ६१ हजार, १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशीही माहिती उपायुक्त ओला यांनी दिली.
ही कामगिरी ठाणेदार खराबे, द्वितीय निरीक्षक एस.टी. परमार, एएसआय ए. वाय. बकाल, उपनिरीक्षक एस.बी. काळे, हवालदार अजय काळे, नायक गजानन निशितकर, कमलेश गणेर, पंकज निकम, प्रकाश राजपल्लीवार, अंकुश घटी, पंकज रामटेके, अतूल चाटे यांनी बजावली.
चार गुन्ह्यांतील फिर्यादींचा शोध
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालातील सीताबर्डीच्या १० गुन्ह्यांचा छडा लागला. मात्र, अन्य जप्तीतील चार गुन्ह्यांचे फिर्यादी कोण, ते गुन्हे कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्याचा आणि फिर्यादींचा पोलीस शोध घेत आहेत.