नागपुरात एटीएम फोडणाऱ्या टोळीला खामगावात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:28 AM2018-06-28T00:28:41+5:302018-06-28T00:31:06+5:30
नागपूर शहरातील तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटून मुंबईकडे पसार होणाऱ्या हरियाणातील चार चोरट्यांना खामगाव पोलिसांनी बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या दरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून चिखली खुर्दनजीक पकडले. पोलिसांनी त्यांच्याजवळून लुटलेले ५३ लाख रुपयांसह देशी कट्टा, स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटून मुंबईकडे पसार होणाऱ्या हरियाणातील चार चोरट्यांना खामगाव पोलिसांनी बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या दरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून चिखली खुर्दनजीक पकडले. पोलिसांनी त्यांच्याजवळून लुटलेले ५३ लाख रुपयांसह देशी कट्टा, स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी दिनकर राठोड, रफिक शहा, भगवान वानखडे हे तिघे नागपूर -मुंबई मार्गावरील गंगा ढाब्याजवळ पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अकोलाकडून खामगावकडे दिल्ली पासिंगची स्कॉर्पिओ सुसाट येताना दिसून आली. यावेळी वाहतूक कर्मचाऱ्यांनी सदर स्कॉर्पिओला गंगा ढाब्याजवळ थांबविण्याचा इशारा दिला; परंतु स्कॉर्पिओ न थांबता पुढे भरधाव निघून गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून रावणटेकडी नजीकच्या टोलनाक्याजवळ स्कार्पिओला थांबविले. पोलिसांनी चालकाला गाडीच्या कागदपत्रांची मागणी करून गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले. गाडीतील एकाने पोलिसांना देशी कट्ट्याचा धाक दाखविला व ते पसार झाले. याबाबत वाहतूक पोलिसांनी ठाणेदारांना कळविले. माहिती मिळताच शिवाजीनगरचे ठाणेदार ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांसह स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग केला. पोलीस मागे असल्याचे पाहताच चोरटे नांदुरा मार्गावरील चिखली आमसरीजवळील पुंडलीक बाबा मंदिराजवळ स्कॉर्पिओ गाडी सोडून शेतात पसार झाले. पोलिसांनी शेतामध्ये चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. यावेळी गावकऱ्यांनीही चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली. मोहम्मद आजमिन मोहम्मद आसरु (२४), मोहम्मद अब्दुल मो.माजीद (२४), आसिफ हुसेन हारुन हुसेन (२५), अरशद खान रहेमान खान सर्व रा.हरियाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर एका महिलेसह दोघे आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. यावेळी पोलिसांनी स्कॉर्पिओ क्रमांक डीएल ४ सी एएफ ४९४३ मधून नगद ५३ लाख रुपये, एक देशी कट्टा, तीन जिवंत काडतुस, ६ मोबाईल, एक गॅस कटर असा माल जप्त केला आहे.
सोमवारी मध्यरात्री दोन तासात तीन एटीएम फोडले
या टोळीने सोमवारी मध्यरात्री दोन तासात तीन एटीएम फोडून ५३ लाखाची कॅश घेऊन पोबारा केला होता. पॉवरग्रीड चौकाजवळील स्टेट बँकेच्या एटीएममधून ११ लाख ३५ हजर ७०० रुपये, पाटणकर चौकातील एसबीआयच्याच एटीएममधून २७ लाख २४ हजार ३०० रुपये आणि तिसऱ्या एटीएममधून १६ लाख १० हजार ६०० रुपये लुटले होते.