प्रॉपर्टी डीलरच्या घरावर गुंडांचा हल्ला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 02:52 AM2016-07-07T02:52:40+5:302016-07-07T02:52:40+5:30
कुख्यात गुन्हेगार युवराज माथनकरने हुडकेश्वर येथील एका प्रॉपर्टी डीलरच्या घरावर हल्ला केला.
माथनकर, शक्तीसह सहा आरोपींना अटक
नागपूर : कुख्यात गुन्हेगार युवराज माथनकरने हुडकेश्वर येथील एका प्रॉपर्टी डीलरच्या घरावर हल्ला केला. संपूर्ण कुटुंबाला बंधक बनविले. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून दोन लाखाच्या दागिन्यांसह दीड लाख रुपये लुटून नेले. ५ जुलै रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची झोप उडाली आहे.
पोलिसांनी युवराजसह सहा आरोपींना अटक केली आहे. यात युवराज ठुनिया माथनकर (३५) रा. शिव हाईट्स, बेलतरोडी, हेमंत पंजाबराव गावंडे (४४) रा.गणेशपेठ, शक्ती संजू मनपिया (३३)रा. रामनगर, पांढराबोड़ी, आशिष अशोकराव कानतोड़े (२६)रा. शिवाजी नगर, रवि रमेश उमाठे (३०) रा. साई सोसायटी, नरेंद्र नगर आणि विशाल मिलिंद वासनिक (२१) रा.विद्यानगर यांचा समावेश आहे.
तक्रारकर्ते सारंग अवतनकर यांचे नंदनवन येथे जैन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. सारंग यांचे काही दिवसंपासून हेमंत गावंडे याच्याशी पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद सुरू आहे. हेमंत त्याला पैसे देण्यासाठी धमकावत होता.
७ जुलै रोजी सारंगचे लग्न आहे. ६ जुलै रोजी हळदीचा कार्यक्रम होता. या समारंभासाठी त्याच्या सर्वश्रीनगर येथील घरात नातेवाईक आले होते. ५ जुलै रोजी सायंकाळी युवराज, हेमंत, शक्ती, आशिष, रवि आणि विशाल आपल्या १२ ते १३ साथीदारांसह सारंगच्या घरी आला. युवराज व हेमंतजवळ ‘पिस्तुल होते तर इतर आरोपींच्या हातात धारदार शस्त्र होते.
जामीन मिळताच गुन्हा
युवराज आणि शक्ती नुकतेच मोका प्रकरणात जामिनावर सुटले आहेत. बाहेर येताच त्यांनी साथीदारांच्या मदतीने वसुली सुरू केली. त्यांना पोलिसांची सुद्धा भीती नाही. या प्रकरणात त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.