गुरुपौर्णिमा विशेष: गुरुदेव सेवाश्रमाचा मानव कल्याणाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:27 AM2018-07-27T10:27:18+5:302018-07-27T10:27:44+5:30

गुरुदेव सेवाश्रमातून राष्ट्रसंताचे हेच विचार आणि मानव कल्याणाचा प्रसार समाजाच्या तळागळापर्यंत पोहचविला जात आहे.

Guru Purnima Special: Gurudev Sevasharma's human welfare fat | गुरुपौर्णिमा विशेष: गुरुदेव सेवाश्रमाचा मानव कल्याणाचा वसा

गुरुपौर्णिमा विशेष: गुरुदेव सेवाश्रमाचा मानव कल्याणाचा वसा

Next
ठळक मुद्देपरिवर्तनाचा विचार समाजात पेरला

मंगेश व्यवहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘गुरु हाडामांसाचा नोव्हे, गुरु नव्हे जाति-संप्रदाय, गुरु शुद्ध ज्ञानतत्त्वची आहे, अनुभवियांचे’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हाडामांसाच्या व्यक्तीला गुरू समजून त्याची पूजा करण्यापेक्षा, त्याचे तत्त्वज्ञान जे सत्याच्या मार्गावर असेल त्याची पूजा करा, असे प्रबोधन केले आहे. गुरुदेव सेवाश्रमातून राष्ट्रसंताचे हेच विचार आणि मानव कल्याणाचा प्रसार समाजाच्या तळागळापर्यंत पोहचविला जात आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामहितापासून राष्ट्रहितापर्यंतची संकल्पना मांडली आहे. महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सेवाभाव, राष्ट्रहित, मानवकल्याण हे विचार समाजात रुजविले आहे. राष्ट्रसंतांच्या या विचारांनी प्रभावित होऊन ते हयात असताना देशभरात ४० हजार शाखा स्थापन झाल्या होत्या. त्याकाळी सामान्यजनांपासून राज्यकर्तेही त्यांच्या विचारांचे पाईक होते. पण राष्ट्रसंतांनी गुरु म्हणून कुणालाही माळ घातली नाही आणि कानही फुंकले नाही. राष्ट्रसंतांनी गुरुला देव मानले. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेला गुरुदेव असे नाव दिले. गुरुदेव मासिक, गुरुदेव विद्यामंदिर, श्रीगुरुदेव सेवाश्रम, श्री गुरुदेव आदर्श विवाह संस्था, श्री गुरुदेव सेवामंडळ या संस्था उभारल्या. राष्ट्रसंत या संस्थांबद्दल म्हणतात, या संस्था तुकडोजी महाराजांच्या चेल्याचपाट्यांच्या संस्था नाही, तर परिवर्तनाचा विचार आहे. खरोखरच राष्ट्रसंतांनी या संस्थांच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार समाजात पेरला.
परंतु आज समाजात गुरुचे पीक आलेले दिसते. देवभोळे लोक गुरुच्या पूजनात धन्यता मानत आहे. त्यांचा गुरु कारागृहाच्या आत असला तरी, त्याच्या पूजनाचे भव्य सोहळे साजरे होत आहे. अंधश्रद्धेत समाजाला बुडविणाऱ्या गुरुंना राष्ट्रसंतांनी कुत्र्याची उपमा दिली आहे. सोबतच ज्या व्यक्तीला आपण श्रद्धास्थानी पूजतो, त्या गुरुच्या विद्वत्तेची पारख करण्यास सांगितले आहे. गुरुबद्दलचे आजही हे तत्त्वज्ञान गुरुदेव सेवाश्रमातून प्रचारक समाजात रुजवित आहे. गुरुदेव सेवाश्रमात गुरुपूजन सोहळ्यात राष्ट्रसंतांचे पूजन न करता त्यांचे विचार पुजले जात आहे.
राष्ट्रसंतांनी गुरुदेव या शब्दाची फोड ‘अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा’ अशी केली आहे. हे सत्कार्य करणाºया प्रत्येक व्यक्तीला गुरु मानले आहे. त्यामुळे गुरुदेव सेवाश्रमाशी जुळलेली सर्व मंडळी एकमेकांशी भेटल्यानंतर ‘जयगुरु’ असे संबोधतात. कारण प्रत्येक व्यक्ती ही महान असल्याचे ते समजतात.

राष्ट्रसंतांपासून प्रभावित होऊन अनेकजण त्यांना गुरू करण्यास इच्छुक होते. पण तुकडोजी महाराज त्यांना वेडा असे संबोधून रोज प्रार्थना, ज्ञान करीत जा आणि त्यानुसार जगत जा, असा सल्ला द्यायचे. राष्ट्रसंतांचा हाच कित्ता आजही गुरुदेव सेवाश्रम, गुरुदेव सेवामंडळातून गिरविला जात आहे.
- ज्ञानेश्वर रक्षक, उपसेवाधिकारी,
श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर

 

Web Title: Guru Purnima Special: Gurudev Sevasharma's human welfare fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.