.. तर प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची माझी तयारी; नाना पटोले यांची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:24 PM2019-05-27T15:24:27+5:302019-05-27T15:26:58+5:30
कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्विकारण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते व नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी केले आहे. या वक्तव्यातून ते प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्विकारण्याची माझी तयारी आहे, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते व नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी केले आहे. या वक्तव्यातून ते प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
नाना पटोले व कॉंग्रेसच्या नेत्यांवर निवडणूक कामात अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. मी जर लोकसभा निवडणूकीत नितीन गडकरी यांच्याकडून पराभूत झालो तर राजकीय संन्यास घेईल, अशी घोषणा पटोले यांनी केली होती. यासंदर्भात त्यांना विचारले असता तो माझा केवळ ‘जुमला’च होता. भाजपचे लोक संन्याशांना राजकारणात आणतात आणि मी एकदा पराभूत झालो तर संन्यास घ्यायला सांगतात. मी राजकीय संन्यास घणार नाही, असे त्यांनी सांगितले. गडकरी व भाजप नेते यांनी आतापर्यंत १०० जुमले केले होते. मी जर एक जुमला केला तर काय बिघडले, असे प्रतिपादन पटोले यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी भंडारा-गोंदियातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आवाहन पटोले यांनी दिले.
निवडणूकीत अडथळा केल्याप्रकरणी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुद्गल व जिल्हा प्रशासनाने निवडणूक काळात आमच्यासोबत दुजाभाव केला. आम्हाला ईव्हीएमची तपासणी करुन दिली नाही. मतदार यादी उशीरा दिली. पटोले यांनी मुद्गल यांना न्यायालयात खेचणार असल्याचे सांगितले. यावेळी पत्रपरिषदेला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह अभिजीत वंजारी, अतुल लोंढे हेदेखील उपस्थित होते.
गिरीश महाजन ‘फोकनाड’
यावेळी नाना पटोले यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ‘फोकनाड’ असे म्हणून त्यांच्यावर जहरी टीका केली. महाजन यांना जळगाव जिल्ह्यातील दुष्काळ निराकरणाच्या अर्थसंकल्पाच्या निधीची माहिती नाही. त्यांना उत्तर देण्यासाठीच मी राजकीय संन्यासाचा ‘जुमला’ मांडला, असे नाना पटोले म्हणाले.
तापमान ‘सेल्सिअस’मध्ये की टक्क्यांमध्ये?
या पत्रपरिषदेदरम्यान पटोले हे फार संभ्रमात असलेले दिसून आले. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे नाव ते सातत्याने अश्विनी म्हणून घेत होते. याशिवाय नागपुरचे तापमान ६७ टक्क्यांवर पोहोचले असे अगोदर वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितल्यावर शहरातील तापमान ‘सेल्सिअस’ऐवजी चक्क ४७ टक्क्यांवर पोहोचल्याचे सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या मागे मास्टरमाइंड कोण?
यावेळी पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीवरदेखील टीका केली. भाजप, आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रचार साहित्य सारखेच होते. त्यातूनच वंचित आघाडी भाजपची ‘टीम बी’ असल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मागे ‘मास्टरमाईंड’ कोण आहे याच विचार करावा, असे नाना पटोले म्हणाले.