सायबर क्राईम वाढतोय....
By Admin | Published: May 21, 2017 02:13 AM2017-05-21T02:13:50+5:302017-05-21T02:13:50+5:30
उपराजधानीतील सायबर गुन्हेगारीत झपाट्याने वाढ होत आहे. सुरू असलेल्या वर्षाच्या चार महिन्यात
हॅकिंग, फेक फेसबुक आयडीचे गुन्हे वाढले : एटीएम कार्डची बनवाबनवीही जोरात
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील सायबर गुन्हेगारीत झपाट्याने वाढ होत आहे. सुरू असलेल्या वर्षाच्या चार महिन्यात उपराजधानीत सायबर गुन्ह्यांच्या २४७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात घडलेल्या सायबर गुन्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे.
कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि त्यानंतर स्मार्ट फोनमुळे जग एका क्लिकच्या अंतरावर आहे. इंटरनेटमुळे माहितीचा खजिना क्षणात उपलब्ध होतो. केवळ तेवढ्याचपुरता इंटरनेटचा वापर मर्यादित राहिला नाही. आर्थिक व्यवहार, जगभरातील माहितीचे आदान-प्रदान आणि विविध प्रकारच्या महत्त्वपूर्ण प्रणालीच्या निमित्तानेही इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्याच गतीने इंटरनेटचा गैरवापर
करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी करणाऱ्यांनी अक्षरश: सर्वत्र हैदोस घातला आहे.
कुणाचे संकेतस्थळ तर कुणाचे अकाऊंट हॅक केले जात आहे. कुणाची बनावट फेसबुक आयडी तर कुणाचे इन्स्टाग्राम अकाऊंट वापरून, बनावट अकाऊंट तयार करून त्या माध्यमातून शेकडो महिला-मुली आणि तरुणांबद्दल बदनामकारक माहिती हेतुपुरस्सर पसरविली जात आहे. सायबर गुन्हेगारांकडून निर्दोष व्यक्तींना बदनाम करण्याचे प्रकार सर्रास केले जात आहेत. हे गुन्हे वाढविण्यात स्मार्ट फोनची भूमिकाही खलनायकासारखी आहे. या सर्व गैरप्रकारांची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी राज्यातील प्रत्येक जिल्हा पोलीस मुख्यालयात सायबर सेलची निर्मिती करवून घेतली. नागपुरातही १५ आॅगस्ट २०१६ ला सायबर सेल सुरू झाले.
सायबर क्राईम वाढतोय....
येथील सहायक पोलीस निरीक्षक विशाल माने आणि त्यांचे सहकारी सायबर गुन्हेगारीचा छडा लावण्याचे आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्येसोबतच उपराजधानीत सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला-मुलींची लज्जास्पद अवस्थेतील छायाचित्रे फेसबुक, व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्हायरल केली जात आहेत. ब्लॅकमेल करण्याचेही प्रमाण वाढले आहे. लॉटरीचे आमिष अन् एटीएम कार्ड नवीन देण्याच्या नावाखाली तसेच कार्ड ब्लॉक करण्याची भीती दाखवून गुन्हेगार अनेकांची रक्कम परस्पर वळती करून घेत आहेत. गेल्या वर्षभरात नागपुरात सायबर गुन्ह्यांची संख्या २४७ होती. यंदा अवघ्या चार महिन्यात ४९४ गुन्हे दाखल झाले आहेत. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे.
———————
हायप्रोफाईल प्रकरणाचा छडा
नागपुरात सायबर सेल सुरू झाल्यानंतर अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास या सेलने लावला. त्यातील एक हायप्रोफाईल प्रकरण दोन महिन्यांपूर्वी सायबर सेलकडे आले. एका प्रतिष्ठित आणि धनाढ्य कुटुंबातील देखण्या तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंट एका आरोपीने हॅक केले. त्यावर तो लज्जास्पद छायाचित्रे आणि कॉमेंट टाकू लागला. तरुणीचे फ्रेण्डस्, फॉलोअरही मोठ्या संख्येत होते. त्यामुळे या तरुणीला प्रचंड मानसिक त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने तक्रारअर्ज केला. सायबर सेलचे सहायक निरीक्षक विशाल माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल दोन महिने हा गुंतागुंतीचा तपास केला. आरोपी हे विकृत कृत्य करून मध्येच अकाऊंट बंद करायचा. त्यामुळे त्याचा छडा लावण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. अखेर येथील तपास पथकाने त्याला हुडकून काढले. आरोपी उच्चशिक्षित आणि चंद्रपूरचा रहिवासी होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो त्या तरुणीचा नातेवाईक होता. त्याने तिला प्रपोज केले होते. तिने नकार देऊन दुसरीकडे प्रेमसंबंध जुळविल्याने आरोपीने हे गैरकृत्य केले. दरम्यान, त्याचा छडा लावल्यानंतर तरुणीने (नातेवाईक असल्यामुळे) गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. यंदाचे आतापर्यंतचे हे सर्वात हायप्रोफाईल प्रकरण होय.
—-
सर्वाधिक गुन्हे आर्थिक फसवणुकीचे
गेल्या वर्षभरात आणि यंदाच्या चार महिन्यात शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे एटीएम कार्डच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक फसवणुकीचे आहेत. त्यापाठोपाठ फेसबुकबाबतचे गुन्हे असून, मेल अकाऊंट हॅकिंगच्याही चार महिन्यात १७ तक्रारी आहेत. एकूण सायबर गुन्हेगारीच्या तक्रारीचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.