भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना; ‘मॅच’साठी तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:51 AM2019-03-04T09:51:54+5:302019-03-04T09:53:08+5:30

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील जामठा स्टेडियमवर मंगळवारी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.

India-Australia cricket match; Tightest security for 'match' | भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना; ‘मॅच’साठी तगडा बंदोबस्त

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना; ‘मॅच’साठी तगडा बंदोबस्त

Next
ठळक मुद्देहॉटेल, स्टेडियमला गराडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील जामठा स्टेडियमवर मंगळवारी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. यापूर्वीच्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्ताच्या तुलनेत यावेळी ३० टक्के पोलीस बंदोबस्त जास्त लावण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. ५ मार्चला जामठ्याला होऊ घातलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने पोलिसांनी कशी सुरक्षा व्यवस्था केली, त्याची माहिती सहआयुक्त कदम यांनी रविवारी सायंकाळी पोलीस जिमखान्यात पत्रकारांना दिली. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मलादेवी आणि परिमंडळ-१चे उपायुक्त विवेक मासाळ उपस्थित होते. कोणत्याही प्रकारच्या घातपाताची धमकी नाही. मात्र, सध्याची स्थिती लक्षात घेता पोलिसांनी सुरक्षेसंबंधाने खबरदारीच्या सर्व उपाययोजना आखल्या आहेत.
छत्रपती चौक ते जामठा स्टेडियमपर्यंत बंदोबस्ताची विभागणी १२ सेक्टरमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी १२०० पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण १५०० पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक शाखेचे ४२५ पोलीसही सुरक्षा व्यवस्थेत तैनात राहणार असल्याचे सहआयुक्त कदम म्हणाले. स्टेडियमच्या आत-बाहेर आणि सभोवताल पोलिसांचे सुरक्षा कवच राहणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू ज्या हॉटेल्समध्ये थांबणार आहेत, त्या हॉटेल्सच्या आत-बाहेर आणि परिसरातही चोख बंदोबस्त लावण्यात येईल. कोणत्याच अनोळखी व्यक्तीला आजूबाजूच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. मैदानाच्या आत-बाहेर पोलिसांव्यतिरिक्त शीघ्र कृती दलाच्या (क्यूआरटी) तुकड्या सज्ज राहणार असून, चार बॉम्ब शोधक आणि नाशक पथकेही (बीडीडीएस) तैनात करण्यात आली आहेत. ऐनवेळी उद्भवणाऱ्या स्थितीमुळे वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून अग्निशमन दल आणि अ‍ॅम्बुलन्सही तयार ठेवण्यात येणार असल्याचे सहआयुक्त कदम यांनी सांगितले.

१० सेक्टरमध्ये वाहतूक पोलीस
विविध वाहनांनी विविध भागातून येणारे क्रिकेट रसिक आणि त्यामुळे या मार्गावर अचानक वाढणारी वाहनांची गर्दी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन बिघडविणारी ठरते. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस १० सेक्टरमध्ये बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहेत. त्यानुसार छत्रपती चौकातून जामठा स्टेडियमपर्यंत वाहतूक शाखेचे पोलीस रंगीत तालीम करणार आहेत, असे यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी सांगितले.
खबरदारीचे दावे प्रत्येक वेळी केले जातात मात्र प्रत्येक सामन्याच्या वेळी वाहतूक रखडते आणि रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, ही बाब लक्षात आणून दिली असता, यावेळी तसे काही होणार नाही, याची आम्ही काळजी घेत असल्याचे उपायुक्त भरणे म्हणाले. त्या अनुषंगानेच वर्धा मार्ग दोन भागात विभाजित करण्यात आला असून आणीबाणीच्या वेळेस किंवा रुग्ण अडकून पडल्यास या एका मार्गाचा वापर केला जाणार आहे, असे ते म्हणाले.

प्रत्येकाची कसून तपासणी
सामना बघण्यासाठी सुमारे ४५ हजार प्रेक्षक येण्याचा अंदाज आहे. सुरक्षेच्या योजनेनुसार स्टेडियमच्या आतच नव्हे तर परिसरातही कुणाला सहजपणे प्रवेश मिळणार नाही. विमानतळावर होते, त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची कसून तपासणी केली जाईल. पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त सकाळपासून रात्रीपर्यंत बंदोबस्ताचा मिनिट टू मिनिट आढावा घेत राहतील. ऐनवेळी वाहनांना आग लागली किंवा धावपळ निर्माण झाली तर चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण होणार नाही, याचीही पुरती काळजी घेण्यात आली आहे.

Web Title: India-Australia cricket match; Tightest security for 'match'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.