मुंबई विद्यापीठ आॅनलाइन पेपर तपासणी घोटाळ्याची चौकशी, तीन सदस्यीय समितीची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:59 AM2017-12-15T00:59:54+5:302017-12-15T01:00:41+5:30
मुंबई विद्यापीठातील आॅनलाइन मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
नागपूर : मुंबई विद्यापीठातील आॅनलाइन मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. तत्कालीन कुलगुरूंसह कोणीही या समितीच्या चौकशीत दोषी आढळले तर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत सांगितले.
कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. गरज पडली तर फौजदारी कारवाईदेखील केली जाईल, हे सांगताना वायकर यांनी या मूल्यांकन घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची कबुली दिली.
अतुल भातखळकर, सुनील शिंदे यांच्यासह जवळपास ३० सदस्यांनी या घोटाळ्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी या प्रकरणी कुलगुरूंची हकालपट्टी झाली
असली तरी ती पुरेशी नाही. उच्च शिक्षण मंत्री व राज्यमंत्र्यांनाही घरी पाठविले पाहिजे, असा हल्लाबोल केला.
राज्य सरकारची परवानगी न घेताच आॅनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली होती, असा बचाव वायकर यांनी या वेळी केला. आॅनलाइन मूल्यांकनाचे काम ज्या कंपनीला देण्यात आले होते तिच्याशी कोणताही करार मुंबई विद्यापीठाने केलेला नव्हता. कराराविनाच काम देण्यात आले, ही चूकच होती, असे वायकर म्हणाले.
या चुकीसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे वायकर म्हणाले.
प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये आयआयटी; मुंबईचे दीपक पाठक आणि व्हीजीटीआयचे धीरेन पटेल यांचा समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबई विद्यापीठात पेपर तपासणीमध्ये गोंधळ झाल्यानंतर राज्यपालांनी कुलगुरूंचा राजीनामा घेतला होता. या प्रकरणाच्या तपासणीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. अनेक घटकांवर चौकशी करण्यात येणार असून त्यात दोषी आढळलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील.
- विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री