अयोध्या मुद्यावर संयम ठेवणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:25 AM2017-11-19T00:25:22+5:302017-11-19T00:31:24+5:30
अयोध्या प्रकरणात लवकर तोडगा निघेल, ही अपेक्षा अयोग्य आहे. या प्रकरणात इतक्या लवकर काहीच होणार नाही. संयम बाळगावा लागेल आणि सर्र्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : अयोध्या प्रकरणात लवकर तोडगा निघेल, ही अपेक्षा अयोग्य आहे. या प्रकरणात इतक्या लवकर काहीच होणार नाही. संयम बाळगावा लागेल आणि सर्र्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. शनिवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीवर भाष्य करण्याचे मात्र त्यांनी टाळले.
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीच्या प्रयत्नामुळे धार्मिक संघटना व आखाड्यांचे राजकारण तापले आहे. रविशंकर यांच्या प्रयत्नांवर हिंदुत्ववादी संघटनांकडूनदेखील नाराजी व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली . संघाच्या घोषपथकाच्या 'स्वरमोहिनी' कार्यक्रमाला देखील ते उपस्थित होते. संघ परिवारातील काही संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या मध्यस्थीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सरसंघचालकांसोबतच्या त्यांच्या भेटीला जास्त महत्त्व आले होते. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ही भेट झाली . मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर श्री श्री रविशंकर यांनी भाष्य केले नाही.
श्री श्री रविशंकर यांचा यू टर्न
अयोध्या व लखनौ येथे आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यांशी त्यांनी चर्चा केली होती . त्यानंतर नागपुरात आल्यानंतर ते उत्साही वाटत होते व सकारात्मक असल्याचे त्यांनी प्रतिपादन देखील त्यांनी केले होते . मात्र शनिवारी त्यांनी ठोस वक्तव्य करण्याचे टाळले . नागपुरात आल्यावर सरसंघचालकांची भेट घेणार असे त्यांनी उघडपणे सांगितले . ही बाब संघाला रुचली नसून याबाबत संघातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली . रविशंकर यांनी देखील यू टर्न घेत आपण फक्त कार्यक्रमासाठी आलो असल्याचे सांगितले .
घोष पथकाच्या तालाने निनादले आसमंत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घोष पथकाचे मोठे महत्त्व आहे. संघाच्या कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचे पथक मानण्यात येणाऱ्या
घोष पथकाचा नागपुरात भव्य कार्यक्रम झाला . या कार्यक्रमाला सरसंघचालक , श्री श्री रविशंकर, गायिका अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर,उदित नारायण, पंडित मनिप्रसाद , उल्हास कशाळकर, सुरेश तळवलकर प्रामुख्याने उपस्थित होते .
देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिथे कुठे पथसंचलन होते, त्यावेळी घोष पथकाचा त्यात आवर्जून समावेश असतो. प्रत्येक शाखेचे घोष पथक असते. दलप्रमुख, घोषप्रमुख यांचा समावेश असलेल्या घोष पथकाद्वारे स्वर, नादांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व देशाभिमान जागविणाऱ्या विविध गीतांचे सादरीकरण करण्यात आले . विशेष म्हणजे या सादरीकरणासाठी काही रचना खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील रचल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.