कलाविष्कारात रंगला ‘किडस् कार्निव्हल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:45 AM2017-11-15T00:45:37+5:302017-11-15T00:45:50+5:30
विविध वयोगटातील चिमुकल्यांनी आपल्या कलाविष्काराने उत्सवात रंगत आणली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध वयोगटातील चिमुकल्यांनी आपल्या कलाविष्काराने उत्सवात रंगत आणली. अप्रतिमरीत्या सादर केलेले एकल नृत्य, समूह नृत्य व गीतगायनाचा निखळ आनंद श्रोत्यांनी अनुभवला. निमित्त होते, लोकमत कॅम्पस क्लब आणि डीपीएस लावा सिटीच्यावतीने आयोजित ‘किडस् कार्निव्हल’चे.
दाभा रिंगरोड येथील लावास्थित डीपीएस स्कूल येथे आयोजित ‘किडस् कार्निव्हल’ हे ‘अवर इंडिया, अवर रिस्पॉन्सिबिलिटी’ या संकल्पनेवर आधारित होते. या उत्सवात मुलांनी एकल गीतगायन, एकल नृत्य आणि समूह नृत्य सादर करून उपस्थित रसिकांना खिळवून ठेवले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्टÑगीताने झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीपीएस लावा सिटीचे संचालक गौतम राजगरिया, ट्रस्टी अशोक अग्रवाला, प्रदीप राजगरिया, प्राचार्य अनुपमा सगदेव उपस्थित होते. या उत्सवाला श्री शिवम् स्टोर्सचे विशेष सहकार्य मिळाले.
मनोरंजनात्मक खेळांचा लुटला आनंद
या कार्निव्हलमध्ये लहान मुलांसाठी घोडे, ऊंट उपलब्ध करून देण्यात आले होते. अनेक मुलांनी याचा आनंद घेतला. शिवाय विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळांच्या स्टॉलवर मुलांच्या उड्या पडल्या होत्या. ‘मॅजिक शो’च्या जादुई जगाचा अनुभवही मुलांनी घेतला. काही मुलांनी आवडत्या कार्टूनचे ‘टॅटू’ही काढून घेतले. ‘मॉम अॅण्ड मी’ घोषवाक्य व फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मुलांसोबतच पालकही सहभागी झाले होते.