महिलांनो, गुणांचा गुणाकार व दुर्गुणांचा भागाकार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:26 AM2018-03-06T00:26:44+5:302018-03-06T00:30:38+5:30
महिलांनो, स्वत:मधील गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार करा, असे आवाहन आम्ही उद्योगिनी संस्थेच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांमध्ये जन्मजातच उद्योजकतेचे गुण असतात. एखाद्या संकटाच्या वेळी आकस्मिक परिस्थितीत घर आणि कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्याची क्षमताही त्यांच्यात असते व असंख्य महिलांनी ती क्षमता सिद्धही केली आहे. रोजच्या खाद्यपदार्थांपासून अनेक व्यवसाय त्या यशस्वीपणे करू शकतात. प्रत्येक महिलेमध्ये ही क्षमता आहे आणि प्रत्येकीच्या जीवनात अशी संधी येते. गरज आहे ती केवळ स्वत:मधील गुण आणि कौशल्य ओळखण्याची. त्यामुळे महिलांनो, स्वत:मधील गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार करा, असे आवाहन आम्ही उद्योगिनी संस्थेच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले.
गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था व कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘उद्यमशील लक्ष्मीची पावले’ या कार्यक्रमात मीनल मोहाडीकर यांच्या मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक रमेश मंत्री, गायत्री संस्थेच्या कांचन गडकरी, कल्पतरू संस्थेच्या नीलिमा बावने, सहकार भारतीच्या विजया भुसारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. मोहाडीकर यांनी त्यांच्या संस्थेच्या आंतरराष्टÑीय स्तरावर सुरू असलेल्या कार्याबाबत माहिती दिली. उद्योगाच्या क्षेत्रात शून्यातून यश प्राप्त केलेल्यांची अनेक उदाहरणे देत यशाचा मार्ग सांगितला. यशस्वी उद्योजक होण्यासाठी पायाला चाके म्हणजे मार्केटिंगचे कौशल्य, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असण्यासोबत वेळ व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सर्वांना एकत्रित घेऊन काम करावे लागते. आपल्या क्षमता ओळखून, कौटुंबिक जबाबदाºया न टाळता अडथळे पार करीत आलेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ‘मी हे करू शकते’ हा सकारात्मक भाव जोपासला पाहिजे. आपली आवड ओळखून निवड केल्यास ते करण्याची सवड आपोआपच मिळेल, असा मंत्र त्यांनी दिला.
योगा ट्रेनिंग हा व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. शहरातील एकटे राहणाºया वृद्ध दाम्पत्यांचे संगोपन हाही व्यवसाय ठरू शकत असल्याचे सांगत पापड, लोणच्यापासून अनेक व्यवसायांची माहिती त्यांनी यावेळी दिली. उद्योग स्थापन केल्यानंतर उद्योग आधार कार्ड, एमएसएमई नोंदणी यासारखे सर्व पेपर वर्क योग्यपणे केले तर शासकीय आणि बँकांच्या विविध योजनांचा लाभ मिळेल, असा सल्लाही त्यांनी दिला. आपल्या वस्तूंची गुणवत्ता, पॅकेजिंग व मार्केटिंग या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्या. आपल्या मुलांना उद्योगापासून परावृत्त करणे, हा दुर्गुण मराठी माणसांमध्ये असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.