‘लोकमत’चा जागतिक संत्रा महोत्सव : चार दिवसीय आयोजन १८ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:20 PM2019-01-14T12:20:24+5:302019-01-14T12:20:54+5:30
लोकमतच्या वतीने जागतिक संत्रा महोत्सवाचे चार दिवसीय आयोजन १८ जानेवारीपासून करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमतच्या वतीने जागतिक संत्रा महोत्सवाचे चार दिवसीय आयोजन १८ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. विदर्भात संत्र्याचे उत्पादन कसे वाढविता येईल तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यावर महोत्सवात विशेष भर देण्यात येणार आहे.
द्राक्षे, आंबे आणि डाळिंबाप्रमाणेच विदर्भातील शेतकरी संत्र्याचे उत्पादन कसे वाढवतील, यावर तज्ज्ञांतर्फे शेतकऱ्यांना विविध सत्रांमध्ये माहिती देण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षे हे शेतकºयांना सर्वाधिक उत्पन्न देणारे फळ आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून पाच हजार कोटींची निर्यात करण्यात येते. आता डाळिंबाचीही स्थिती सुधारली आहे. अशावेळी विदर्भातील शेतकऱ्यांकडे संत्र्यासारखे सोने आहे. जगात त्याच्यासारखी दुसरी चव नाही. त्यांनी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनात का मागे राहावे, हा खरा प्रश्न आहे. याकरिता लोकमतचा महोत्सव शेतकऱ्यांच्या विकासाचा आणि सर्वांना सामावून घेणारा उपक्रम आहे. या महोत्सवात शेतकºयांना आधुनिक तंत्रज्ञान आणि संत्रा उत्पादन वाढीची माहिती देण्यात येणार आहे. शेतकरी आणि मार्केटची गॅप कशी भरून निघेल तसेच घरगुती आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक फार्मिंग व सीड ते संत्रा फळापर्यंत सांगणार आहे. अमरावती रोड येथील आयसीएआर व सीसीआयआर या संस्थांतर्फे नव्याने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि सध्या सुरू असलेल्या संशोधनाची माहिती तसेच त्याचा उपयोग कसा करायचा, यावर सर्वंकष माहिती देण्यात येणार आहे.
जागतिक संत्रा महोत्सव १८ ते २१ जानेवारीपर्यंत
यावर्षी लोकमततर्फे जागतिक संत्रा महोत्सवाचे चार दिवसीय आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत रेशीमबाग मैदानावर कृषी प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. शिवाय सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात वेगवेगळे उपक्रम आणि ग्राहक प्रदर्शन होणार आहे. तसेच २० आणि २१ जानेवारीला सिव्हिल लाईन्स येथील देशपांडे सभागृहात विविध कार्यक्रम होणार आहेत. शेतकऱ्यांना काही प्रश्न, समस्या असतील तर त्यांनी संपादकांच्या नावे पाठवाव्यात, असे आवाहन लोकमतने केले आहे. त्या सरकारदरबारी मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांशी बांधिलकी
तुम्ही आज जेवलात ना मग शेतकरी आणि शेतमजुरांना धन्यवाद द्या. आतापासून शेती आणि शेतकऱ्यांसंबंधीचे सर्व विषय समाजासमोर येणे गरजेचे आहे. त्यासंबंधी चर्चा झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांनाही सर्वसामान्य लोकांप्रमाणे जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य दिसले पाहिजे आणि यासाठी जैन इरिगेशन कायम कटिबद्ध आहे.
- अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.
फळे टिकवून ठेवण्यावर संशोधन
कंपनी संत्रा फळ जास्त काळ टिकवून ठेवण्यावर संशोधन करीत आहे. त्याकरिता नवीन उत्पादने तयार केली आहेत. शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि त्यांची जीवनशैली कशी वाढेल, यावर भर देण्यात येत आहे.
- सागर कौशिक, अध्यक्ष,
(कॉर्पोरेट अफेअर अॅण्ड इंडस्ट्रीज रिलेशन),यूपीएल लिमिटेड.