अचूक डिजिटल सातबारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 09:26 PM2018-05-02T21:26:41+5:302018-05-02T21:26:56+5:30
शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालकीहक्काबाबत सातबारा हे महत्त्वाचे दस्ताऐवज असून खरीप कर्जापासून सर्वच योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. डिजीटल आॅनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र दिनापासून घेतला आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या नोंदीसह अनुषंगिक सर्व नोंदी अचूकपणे घेऊन डिजिटल सातबारा उपलब्ध करून द्यावा यासाठी नागपूर जिल्हा आदर्श ठरावा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालकीहक्काबाबत सातबारा हे महत्त्वाचे दस्ताऐवज असून खरीप कर्जापासून सर्वच योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. डिजीटल आॅनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र दिनापासून घेतला आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या नोंदीसह अनुषंगिक सर्व नोंदी अचूकपणे घेऊन डिजिटल सातबारा उपलब्ध करून द्यावा यासाठी नागपूर जिल्हा आदर्श ठरावा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबाराचे वितरण शेतकºयांना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्र दिनापासून राज्यात सर्व शेतकºयांना सातबारा देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यस्तरावर मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. नागपूर विभागीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्ह्यात ८२६४ तर विभागात ६०२०६ डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपलब्ध झाला आहे.
यावेळी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रास्ताविक केले.
उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी आभार मानले.
पहिला डिजिटल सातबारा
शेतकऱ्यांना शेतीच्या मालकीहक्काबाबत महत्त्वाचे दस्ताऐवज असलेला पहिला डिजिटल सातबारा ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा तयार करण्यात आला असून विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. डिजिटल सातबारा वितरणाचा शुभारंभ बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रत्येक तालुकास्तरावरील पाच शेतकऱ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते डिजिटल सातबाराचे वितरण करण्यात आले.
उत्कृष्ट काम केलेल्या तलाठ्यांचा सत्कार
नागपूर जिल्ह्यात १९५६ गावांचा समावेश असून ७ लक्ष ६१ हजार सातबारांची संख्या आहे. त्यापैकी डिक्लेरेशन ३ चे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात आले तर ८ अ ची संख्या ६ लक्ष ८५ हजार आहे. जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या तलाठ्यांना तसेच डाटाबेस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डिजिटलायझेशनचे काम उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी धनंजय केसकर, तलाठी अजय खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला.
आॅनलाईन सातबारावरच योजनांचा लाभ द्या
नागपूर विभागातील ७ हजार ३६१ गावात संगणकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून ३१ मे पर्यंत विभागात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून डिजिटल सातबारा उपलब्ध करून देण्यात येईल. यापुढे हस्तलिखित सातबारा मिळणार नाही. कोणत्याही कामासाठी सातबारा न मागता आॅनलाईन सातबारा बघून कर्जासह शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे आवाहन अनुप कुमार यांनी केले.