‘लिव्ह इन’चा दु:खद शेवट; काटाेलमध्ये प्रेयसीची तर कामठीत प्रियकराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 10:28 AM2022-05-27T10:28:24+5:302022-05-27T10:32:21+5:30
दाेघेही तुमसर, जिल्हा भंडारा येथे नातेवाईकाकडे लग्नाला सोबत गेले. तिथे दाेघांमध्ये जाेरात भांडण झाले. याच भांडणात संजयने कविताला मारहाण केल्याने ती तुमसरहून माहेरी काटाेलला गेली तर संजय कामठीला आला हाेता.
कामठी (नागपूर) : मागील काही वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने काटाेल शहरात तिच्या माहेरी विषारी पावडर खाऊन आत्महत्या केली. ही बाब कळताच प्रियकरानेही फिनाईल प्राशन करून कामठीत आत्महत्या केली. प्रियकराची पत्नी तर प्रेयसीच्या पतीचे निधन झाल्यानंतर ‘ते’ दाेघेही एकत्र ‘लिव्ह इन’मध्ये राहात हाेते.
संजय शालिकराम गजभिये (४५, रा. छत्रपतीनगर, कामठी) व कविता वानखेडे (३५), अशी मृतांची नावे आहेत. दाेघेही मंगळवारी (दि. २४) तुमसर, जिल्हा भंडारा येथे नातेवाईकाकडे लग्नाला सोबत गेले. तिथे दाेघांमध्ये जाेरात भांडण झाले. याच भांडणात संजयने कविताला मारहाण केल्याने ती तुमसरहून माहेरी काटाेलला गेली तर संजय कामठीला आला हाेता. त्यातच कविताने बुधवारी (दि. २५) सकाळी ८ वाजताच्या सुमारास विषारी पावडर खाल्ले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर तिला नागपूरला रेफर केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
कविताच्या भावाने ही माहिती संजयला बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास फाेनवर दिली. त्यानंतर त्याने घरी फिनाईल प्राशन केले. त्यामुळे त्याला कामठी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले असता, रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याचाही मृत्यू झाला. या प्रकरणात काटाेल व कामठी (नवीन) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपासाला सुरुवात केली आहे.
तो विधूर, ती विधवा, दोघांची मने जुळली
संजयची पत्नी माधुरीचे आकस्मिक निधन झाल्यानंतर ताे कवितासाेबत राहायचा. त्याला माधुरीपासून साक्षी (१८) व वैभव (१७) ही दाेन मुले आहेत. कविता मूळची काटाेल शहरातील रहिवासी असून, तिचे पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश येथील दिलीप वानखेडे याच्याशी विवाह झाला हाेता. दिलीपच्या अपघाती मृत्यूनंतर ती संजयसाेबत कामठी शहरात राहायची.