अ.भा. मराठी साहित्य संमेलन; रविवारी जाहीर होणार नवीन संमेलनाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 10:28 AM2017-12-06T10:28:14+5:302017-12-06T10:28:55+5:30
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गुजरात राज्यातील बडोदा येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून रविवारी १० डिसेंबर रोजी निर्वाचित संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गुजरात राज्यातील बडोदा येथे होत आहे. यंदाच्या पंचरंगी लढतीत कोण बाजी मारतो याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून शनिवारी ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ पर्यंत सर्व मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचलेल्या असतील. रविवारी १० डिसेंबर रोजी निर्वाचित संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, लक्ष्मीकांत देशमुख आणि राजन खान हे पाच उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात आहेत. अखिल भारतीय मराठी जणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षाची निवड जेमतेम १ हजार ७० मतदार करीत असतात. त्यापैकी फक्त ४०५ मतपत्रिका ४ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत पोचल्या होत्या, अशी माहिती आहे. शेवटच्या दोन दिवसात मतपत्रिका येण्याचा वेग वाढेल, अशी अपेक्षा आहे. मतदारांना मतपत्रिका पाठवताना काहींचे पत्ते चुकले. त्यांना पुन्हा डुप्लिकेट मतपत्रिका पाठवण्यासोबतच ज्यांचे राहण्याचे ठिकाण बदलले आहे, त्यांच्या विनंतीवरून त्यांनाही पुन्हा डुप्लिकेट मतपत्रिका पाठवल्याचे कळते. अखेर ही दीर्घ प्रक्रिया पूर्ण होत आली असून निकाल जाहीर व्हायला आता केवळ चार दिवस उरले आहेत. सुरुवातील पंचरंगी वाटणारी ही निवडणूक आता जवळजवळ दुहेरी लढतीवर येऊन थांबली आहे. मतदानाच्या विभाजनाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडते त्यावरून नवीन संमेलनाध्यक्ष ठरणार आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत बृहन्महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये या निवडणुकीबाबत विशेष उत्साह आहे. ते आपला कौल कुणाला देतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. उमेदवारांचे प्रचार कार्य थांबले असून ते निकालाची उत्कटतेने प्रतीक्षा करीत आहेत. रविवारी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात जाहीर होणारे नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षाचे नाव विदर्भातले असेल की पश्चिम महाराष्ट्रातले याकडेही त्यांचे लक्ष लागले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारासाठी विदर्भातून फोन
कुणी कितीही नाकारले तरी या निवडणुकीमध्ये प्रादेशिकवादाचा ‘फॅक्टर’ महत्त्वाचा ठरतोच. संमेलनाध्यक्ष आपला प्रांतातला असावा, असा सर्वांचाच प्रयत्न असतो. परंतु यंदा विदर्भातील चित्र वेगळे होते. विदर्भातीलच काही साहित्यिकांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी तिकडच्या आपल्या मित्रांना फोन केल्याची चर्चा असून अशा ‘फोनाफोनी’ने विदर्भातील उमेदवारांचे किती नुकसान केले हेही निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.