अंबाझरी वनक्षेत्रात ‘मारुती चितमपल्ली बर्ड पार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:37 AM2017-11-11T01:37:01+5:302017-11-11T01:37:17+5:30

पक्ष्यांचे नंदनवन असलेले नागपुरातील अंबाझरी वनक्षेत्र हे आयुष्याची तब्बल ४० वर्षे महाराष्टÑातील विविध जंगलांमध्ये वास्तव्य करणारे, .....

'Maruti Chitampalli Bird Park' in Ambazari Wildlife Sanctuary | अंबाझरी वनक्षेत्रात ‘मारुती चितमपल्ली बर्ड पार्क’

अंबाझरी वनक्षेत्रात ‘मारुती चितमपल्ली बर्ड पार्क’

googlenewsNext
ठळक मुद्देपक्षी व वन्यजीव तज्ज्ञांची मागणी : वनमंत्र्यांना प्रस्ताव देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पक्ष्यांचे नंदनवन असलेले नागपुरातील अंबाझरी वनक्षेत्र हे आयुष्याची तब्बल ४० वर्षे महाराष्टÑातील विविध जंगलांमध्ये वास्तव्य करणारे, आपले उभे आयुष्य पक्ष्यांसाठी खर्ची घालणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या नावाने ओळखले जावे, असा मानस अनेक वन्यजीव व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला असून यासंदर्भातील प्रस्ताव पुढील आठवड्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविण्यात येणार आहे.
२२पक्ष्यांचा अभ्यास करून तो समाजापुढे पुस्तकरूपात ठेवणारे, असे महर्षी आपल्या विदर्भात आहेत, ते वनाधिकारी पण होते, पण आज समाज व वनविभाग त्यांना विसरत चालला आहे. तेव्हा त्यांच्या कार्यास नमन करून हा प्रस्ताव आम्ही वनमंत्र्यांकडे देत आहोत, अशी माहिती नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते यांनी दिली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रस्तावाला गोपाळ ठोसर, डॉ अनिल पिंपळापुरे, डॉ जयंत वडतकर, दिलीप गोडे, किशोर रिठे, संजय देशपांडे, स्वानंद सोनी, श्री. मराठे, विशाखा राव, अविनाश लोंढे, संजय सोनटक्के, दिलीप वीरखडे या सर्व पर्यावरण व वन्यजीव क्षेत्रात कार्यरत मंडळींनी पाठिंबा जाहीर केला आहे. शासनाने हा प्रस्ताव स्वीकारुन अंबाझरी राखीव वनक्षेत्राचे नामकरण ‘मारुती चितमपल्ली बर्ड पार्क’ असे केल्यास तो त्यांच्यासाठी सर्वोच्च सन्मान ठरेल, अशी या तज्ज्ञांची भूमिका आहे.
ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ गोपाळ ठोसर यांनी या प्रस्तावाला पांिठंबा देताना सांगितले की, बावनथडी व कालिसरार धरणात जे वनक्षेत्र गेले त्याच्या मोबदल्यात गोरेवाडाचे १८०० हेक्टर व अंबाझरीचे ९०० हेक्टर क्षेत्र वनविभागाला देण्यात आले होते. वनविभागाकडे हे क्षेत्र हस्तांतरित होण्यापूर्वी जणू ते लुटण्यासाठीच आहे अशी त्याची अवस्था झाली होती.
त्यावेळीही या परिसराला वाचविण्यासाठी तो डॉ. सलीम अली पक्षी अधिवास म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली होती. परंतु आमची शक्ती कमी पडल्याने यश मिळाले नाही. नागपूरच्या हृदयस्थानी असलेले २७०० हेक्टर वनक्षेत्र आज केवळ वनविभागामुळे वाचले आहे याची त्या विभागाला सुद्धा जाणीव नसावी, ही दु:खाची बाब आहे. परंतु आता अंबाझरी परिसराला मारुती चितमपल्ली यांचे नाव दिल्यास त्याची उतराई करण्याची चांगली संधी वनविभागाला प्राप्त झाली आहे. यानिमित्ताने त्यांच्याच विभागाच्या जागतिक कीर्तीच्या एका निवृत्त पक्षितज्ज्ञाचा सन्मान केल्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडेल, अशी भावनाही ठोसर यांनी व्यक्त केली आहे.
पक्ष्यांचे नंदनवन अंबाझरी
अंबाझरी राखीव वनक्षेत्र हे पक्ष्यांचे नंदनवन आहे. स्थानिक पक्ष्यांसोबतच स्थलांतरित पक्ष्यांचीही येथे मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. विशेष म्हणजे नागपुरात पक्ष्यांच्या विविध ३१५ प्रजाती आढळतात. त्यापैकी २६५ प्रजाती या एकट्या अंबाझरी वनक्षेत्रात आहेत. ग्रे बुस्टार्डसारखा स्थलांतरित पक्षी फक्त अंबाझरीत दिसतो. याशिवाय स्वर्गीय नर्तक, इंडियन पिट्टा या पक्ष्यांचा हा ब्रिडिंग कॉरिडोर आहे. गेल्या वर्षी तर येथे फ्लेमिंगोसुद्धा उतरला होता. याशिवाय रेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, स्पॉट व्हील, इझंट टेल्ड जकाना, कॉमन टिल, युरेशियन व्हीसन, मल्हार्ड हे स्थलांतरित तर कॉमन टील, लालसरी (रेड क्रेस्टेड), कॉमन पोचार्ड, गडवाल, ब्राऊन डक, तुर्रेवाले बदक आदी स्थानिक पक्षी येथे बघण्यात आले आहेत. येथील माळरान अत्यंत सुंदर असून हा संपूर्ण परिसर म्हणजे जैवविविधतेचा स्वर्ग आहे. शहरातील ही वनक्षेत्रे जपणे मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे.
 

Web Title: 'Maruti Chitampalli Bird Park' in Ambazari Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.