मुंबईचा पोलीस बनला नागपुरात गुन्हेगार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:01 PM2018-05-05T15:01:15+5:302018-05-05T15:01:34+5:30
पोलीस अधिकारी बनलेल्या व्यक्तीला समाजात मोठा मान मिळतो. त्याला गुन्हेगारांना वेसण घालण्याचे अधिकार प्राप्त होतात. मात्र, एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती वाईट असेल तर तो कायद्याचा रक्षक बनल्यानंतरही पोलिसासारखा नव्हे तर गुन्हेगारासारखाच वागतो. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या हवालाकांडातील आरोपी पोलीस अधिकारी सुनील पांडुरंग सोनवणे (वय ४६) हे त्याचे उदाहरण ठरले आहे.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस अधिकारी बनलेल्या व्यक्तीला समाजात मोठा मान मिळतो. त्याला गुन्हेगारांना वेसण घालण्याचे अधिकार प्राप्त होतात. मात्र, एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती वाईट असेल तर तो कायद्याचा रक्षक बनल्यानंतरही पोलिसासारखा नव्हे तर गुन्हेगारासारखाच वागतो. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या हवालाकांडातील आरोपी पोलीस अधिकारी सुनील पांडुरंग सोनवणे (वय ४६) हे त्याचे उदाहरण ठरले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक झाला तरी सुनील सोनवणेचीवृत्तीच मुळात गुन्हेगारी स्वरूपाची आहे. पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालेला सोनवणे १९९५ ला हवालदार झाला. २०११ मध्ये तो पोलीस उपनिरीक्षक बनला. त्याला मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून नियुक्ती मिळाली. तेथे कार्यरत असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्यावर शोषणाचा आरोप लावला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने शरीरसंबंध प्रस्थापित केले. आता तो लग्नास नकार देत असल्याची तिची तक्रार होती. वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली. पीडितेवर दबाव आणू नये म्हणून सोनवणेची मुंबई अन् पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर थेट नागपुरात बदली केली. काही दिवसांपूर्वीच त्याच्या त्या प्रकरणाची चौकशी नागपूर पोलिसांना पाठविण्यात आली. ती सुरूच आहे. दरम्यान, त्याला नागपुरात नंदनवन पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.
नंदनवन नव्हे, कोणत्याही पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या निमित्ताने हाती लागलेल्या गुन्हेगारांशी पोलिसांसोबत ओळख झाली की त्यातील बहुतांश गुन्हेगारांचा पोलीस खबरे म्हणून चांगल्याप्रकारे वापर करून घेतात. अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी, फरार गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी अवैध धंद्यांची माहिती घेण्यासाठी या खबºयांचा जवळपास प्रत्येकच पोलीस वापर करीत असतो. अनेकदा गैरप्रकारात गुंतलेल्या गुन्हेगारांकडून पोलिसांना वेगळी चंदीही मिळते. ते अनेक प्रकरणात मांडवली घडवून आणतात. त्यातूनही संबंधित पोलिसांना रक्कम मिळवून दिली जाते. कुख्यात गुंड सचिन पडगिलवार आणि रवी माचेवारकडूनही एपीआय सोनवणेचे मीटर अशाच पद्धतीने सुरू होते. मोठमोठ्या रकमेचे अनेक डाव सोनवणेने या गुंडांच्या मदतीने साधले होते. त्यामुळे तो निर्ढावला होता. नव्हे कुख्यात गुन्हेगाराच्या संगतीने त्याच्यातील गुन्हेगाराने उसळी मारली होती. त्याचमुळे हवाला रोकड येणार असल्याची टीप मिळताच सोनवणेने ही रोकड पकडण्याऐवजी ती लुटण्याचे षड्यंत्र रचले. त्यानुसार, शनिवारी २८ एप्रिलला दिवसा ड्युटी आटोपल्यानंतर सोनवणेने हवालाची रक्कम लुटण्यासाठी रात्रभर जागरण केले.
रात्रभर चालले फोनो फ्रेण्ड
हवालाची रोकड लुटण्याचा कट रचल्याच्या क्षणापासून तो रोकड लुटल्यानंतर आणि तिची विल्हेवाट लावेपर्यंत एपीआय सोनवणे त्याचे साथीदार पोलीस कर्मचारी विलास वाडेकर आणि सचिन भजबुजे तसेच गुन्हेगार सचिन पडगिलवार आणि रवी माचेवार हे एकमेकांच्या निरंतर संपर्कात होते. त्यांचे फोनोफ्रेण्ड शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत चालले. याच फोनोफ्रेण्डचा कॉल डिटेल्समधून उलगडा झाला अन् गुन्हेगार तसेच पोलिसांची अभद्र युती उजेडात आली.
कळमना आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये (सीमारेषा) प्रजापती चौकाजवळची रेल्वेलाईन आहे. या रेल्वेलाईनच्या पलिकडे कळमना पोलिसांकडून हवाला व्हॅन (डस्टर कार) तपासली जात असल्याचे पाहून त्याने रात्रपाळीत कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोनुळे यांना कळमना हद्दीत शिरायला सांगून ही कार नंदनवनच्या हद्दीत आणली. त्यानंतर ती पावणेसहा कोटींची रोकड भरून असलेली ही डस्टर कार कुख्यात गुंड सचिन नारायण पडगिलवार (वय ३७), रवी रमेश माचेवार (वय ३५), गजानन भालेनाथ मुगधुने (वय २७) आणि प्रकाश बबलू वासनिक (वय २२, सर्व रा. नंदनवन झोपडपट्टी) यांच्या हवाली करून हवालात २ कोटी, ५४ लाख, ९२ हजार, ८०० रुपयांचा हवाला केला. हे सर्व केल्यानंतरही निर्ढावलेल्या सोनवणेने आपल्या कोणत्याच वरिष्ठांना त्याची पुसटशी कल्पनादेखील येऊ दिली नाही. मात्र, काही तासातच वासनिकचे पाप फुटले अन् ज्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत तो अनेक गुन्हेगारांना डांबत होता, त्याच कोठडीत आज त्याला आत जावे लागले.