काटोलमधील पोटनिवडणूक जिंकून दाखवा; आशिष देशमुखांचं भाजपाला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 02:55 PM2018-10-06T14:55:05+5:302018-10-06T17:19:20+5:30
मी आमदारकीचा राजीनामा देऊन चार दिवस झाले मात्र अजून राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही.
नागपूर - मी आमदारकीचा राजीनामा देऊन चार दिवस झाले मात्र अजून राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही. माझा राजीनामा तातडीने स्वीकारण्यात यावा आणि भाजपाने काटोलमध्ये पोटनिवडणूक जिंकून दाखवावी असं भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.
भाजपामध्येही खदखद आहे. मी प्रत्येक लोकप्रतिनिधीला पत्र पाठवलं आहे, मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही खदखद बाहेर पडेल. तसेच तरुण, महिला, दलित, मुस्लिम, हलबा आदींसह सर्वांमध्येच असंतोष आहे, त्यामुळे नागपूरची लोकसभा भाजपा आणि नितीन गडकरी यांच्यासाठी कठीण झाली आहे.
गडकरी यांनी येथून निवडणूक लढवू नये असंही देशमुख यांनी म्हटलं आहे. मी आता राष्ट्रीय राजकारण करेन, विधानसभा निवडणूक लढणार नाही. मात्र पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिल्यास नागपूरसह विदर्भात कुठून ही लोकसभा लढण्यास तयार असल्याचं आशिष देशमुख यांनी सांगितलं.
मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.