नागपूर अधिवेशनावर हल्लाबोलपूर्वीच पोलिसांनी केली नाकाबंदी; तणावपूर्ण स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 09:10 PM2017-12-11T21:10:13+5:302017-12-11T21:15:21+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचे तीन वर्षांचे अपयश चव्हाट्यावर आणण्यासाठी काढलेली हल्लाबोल दिंडी पदयात्रा सोमवारी नागपूर शहराच्या हद्दीत दाखल झाली. हॉटेल प्राईडसमोर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचे तीन वर्षांचे अपयश चव्हाट्यावर आणण्यासाठी काढलेली हल्लाबोल दिंडी पदयात्रा सोमवारी नागपूर शहराच्या हद्दीत दाखल झाली. हॉटेल प्राईडसमोर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न करताना झालेल्या झटापटीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाताला लागले. पोलिसांनी सुप्रिया सुळे यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेले माजी मंत्री अनिल देशमुख, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार संदीप बजोरिया यांच्यासह १० पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामुळे कार्यकर्ते भडकले. तणाव निर्माण झाल्याने काही वेळांनी पोलिसांनी नेत्यांना सोडून दिले.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात आज, मंगळवारी विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चापूर्वीच राष्ट्रवादीने विदर्भात सरकारविरोधी वातावरण तापविण्यासाठी १ डिसेंबरपासून यवतमाळ येथून हल्लाबोल दिंडी पदयात्रा सुरू केली. ११० किलोमीटरचा प्रवास करीत ११ व्या दिवशी ही दिंडी सोमवारी सकाळी नागपूर शहराच्या हद्दीत दाखल झाली. पदयात्रेला पोलिसांनी नागपूर विमानतळाजवळ हॉटेल प्राईडच्या पूर्वी अडविले.दिंडीला अडविल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली व रस्त्यावरच ठाण मांडले.
दरम्यान, पोलिसांनी सुप्रिया सुळे व अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, त्यानंतरही आंदोलक रस्ता सोडण्यास तयार नव्हते. शेवटी पोलिसांनी सुप्रिया सुळे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. महिला कार्यकर्त्यांनी याला जोरदार विरोध केला. या दरम्यान पोलिसांशी झालेल्या झटापटीत सुळे यांच्या हाताला लागले. त्यामुळे कार्यकर्ते आणखीच भडकले. तणाव निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, आनंद परांजपे, संदीप बजोरिया आदींना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसविले. यामुळे कार्यकर्ते भडकले. कार्यकर्त्यांनी ही पोलीस व्हॅन रोखण्यासाठी व्हॅनची हवा सोडली. गाडीच्या टपावर चढले. सरकार व पोलिसांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. शेवटी तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी काही वेळांनी सर्वच नेत्यांची सुटका केली. लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन पोलिसांच्या माध्यमातून दडपण्याचा सरकारने प्रयत्न केला, असा आरोप माजी मंत्री भास्कर जाधव यांनी करीत या घटनेचा निषेध केला.
वाढदिवशी शरद पवार रस्त्यावर
- विरोधी पक्षांतर्फे सरकारविरोधात मंगळवारी जनआक्रोश-हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे १२ डिसेंबरला पवारांचा वाढदिवस आहे. तब्बल ३७ वर्षांनंतर पवार हे वाढदिवशी नागपूरच्या रस्त्यावर आंदोलनात उतरल्याचे पहायला मिळणार आहे. शरद पवार यांनी १९८० मध्ये मुख्यमंत्री ए. आर. अंतुले सरकारच्याविरोधात ऐतिहासिक मोर्चा काढला होता. तेव्हा शरद पवार यांनी पुलोदचे नेतृत्व केले होते. या मोर्चाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता.
चव्हाण तळ ठोकून राष्ट्रवादीही सज्ज
- मोर्चाच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण महिनाभरापासून राज्यभरात पदाधिकाºयांच्या बैठका घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते नागपुरात तळ ठोकून आहेत. कोणत्या जिल्ह्यातून किती लोक येणार याचा पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. गेल्यावर्षी चव्हाण यांच्या नेतृत्वात विधिमंडळावर काढलेला जनआक्रोश मोर्चा लक्षवेधी ठरला होता. यावेळीही मोर्चा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसची जोरात तयारी सुरू आहे. शरद पवार सहभागी होणार असल्याने राष्ट्रवादीने मोर्चासाठी पूर्ण ताकद लावली आहे. यवतमाळहून काढलेल्या हल्लाबोल दिंडीयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीची रंगीत तालिमही झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत.