हरीश साळवे यांच्यामुळे वाढला नागपूरचा गौरव

By admin | Published: April 2, 2015 02:36 AM2015-04-02T02:36:52+5:302015-04-02T02:36:52+5:30

यंदा पद्मभूषण सन्मान प्राप्त झालेल्या मान्यवरांमध्ये नागपुरात जन्मलेल्या आणि न्यायासाठी खपणाऱ्या एका लढवय्याचाही समावेश आहे.

Nagpur's pride grew due to Harish Salve | हरीश साळवे यांच्यामुळे वाढला नागपूरचा गौरव

हरीश साळवे यांच्यामुळे वाढला नागपूरचा गौरव

Next

नागपूर : यंदा पद्मभूषण सन्मान प्राप्त झालेल्या मान्यवरांमध्ये नागपुरात जन्मलेल्या आणि न्यायासाठी खपणाऱ्या एका लढवय्याचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील व माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे असे या लढवय्याचे नाव आहे. नुकत्याच आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले. विधी क्षेत्रातील मान्यवरांनी साळवे यांना हा सन्मान मिळाल्यामुळे आनंद व्यक्त करतानाच नागपूरचा गौरव वाढल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र के. पी. साळवे यांचे सुपुत्र असलेले हरीश साळवे देशातील एक निष्ठावंत आणि प्रामाणिक विधिज्ञ म्हणून ओळखले जातात. राजकारणाचा वारसा असलेल्या घरात जन्म घेऊनही हरीश साळवे यांनी वेगळी वाट चोखाळली. कुठल्याही राजकीय पक्षासोबत ते सक्रियपणे जुळले नाहीत. म्हणूनच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचा पुत्र असतानाही तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये त्यांना सरकारच्या सॉलिसिटर जनरलपदी नेमले होते. सन २००२ पर्यंत साळवे या पदावर होते. काही वैयक्तिक कारणांमुळे या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांनी नकार दिला होता. देशातील प्रमुख कॉर्पोरेट घराण्यांचे सर्वात मोठे वकील अशीही साळवेंची एक ओळख आहे. ‘सर्व उद्योगपती भ्रष्ट आणि अप्रामाणिक असल्याचा एक सार्वत्रिक समज आहे, असे असेल तर सर्वांना तुरुंगात डांबा’, असे हरीश साळवे एका मुलाखतीत म्हणाले होते. गुजरात दंगलीतील पीडित बिल्किस बानोचा खटला साळवे यांनी लढला होता.
हरीश साळवे यांंचे शालेय शिक्षण एसएफएस शाळेत झाले आहे. सदर येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. साळवे यांनी सुरुवातीला ‘सी.ए.’चे शिक्षण घेतले होते. यानंतर ते वकिलीकडे वळले. करविषयक कायद्यांचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला त्यांचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी १९८० मध्ये वकिली व्यवसायाला सुरुवात केली. यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ते प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. काही उच्च न्यायालयांतही त्यांनी वकिली केली आहे. त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले आहे. त्यांनी माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत कार्य केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Nagpur's pride grew due to Harish Salve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.