राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रच्या मिशनला लागले विदर्भात ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 09:50 AM2017-12-15T09:50:40+5:302017-12-15T09:52:47+5:30

महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे.‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या नावाने मिशनची सुरुवात झाली आहे. परंतु या मिशनला विदर्भातच ग्रहण लागले आहे.

National Blindness Reduction Program fails in Vidarbha | राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रच्या मिशनला लागले विदर्भात ग्रहण

राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रच्या मिशनला लागले विदर्भात ग्रहण

googlenewsNext
ठळक मुद्देमेडिकल सोडल्यास सर्वांचे लक्ष्य अपूर्णमेयो, उपजिल्हा रुग्णालय, एनजीओ हॉस्पिटल अपयशी

सुमेध वाघमारे।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे.‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ या नावाने मिशनची सुरुवात झाली आहे. परंतु या मिशनला विदर्भातच ग्रहण लागले आहे. नागपूरचे मेडिकल सोडल्यास मेयो, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सहा एनजीओ रुग्णालयांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे दिलेले लक्ष्यच गाठता आले नाही. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयांना या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याची मदत दिली जाते, तर एनजीओ हॉस्पिटल्सना प्रति रुग्ण हजार रुपये व इतरही शासकीय सोयी पुरविल्या जातात. त्यानंतरही हे रुग्णालय अपयशी ठरल्याने ‘ राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमा’ला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे चित्र आहे.
दरवर्षी मोतीबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्याची सरासरी काढल्यास त्याची टक्केवारी ७२ टक्के आहे. एकट्या महाराष्ट्रत १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. याला घेऊन ‘राष्टÑीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत’ दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिल्या जाते. त्यानुसार या कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ या वर्षाकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) २,५०० मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. केवळ याच रुग्णालयाने लक्ष्य पूर्ण केले. एवढेच नव्हे तर त्यापेक्षा जास्त २,६६१ शस्त्रक्रिया केल्या.

मेयोचे केवळ ५५ टक्केच लक्ष्य
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) २००० मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. परंतु ५५ टक्केच लक्ष्य पूर्ण करीत १०९९ शस्त्रक्रिया केल्या. उपजिल्हा रुग्णालय कामठी, उपजिल्हा रुग्णालय रामटेक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे डागा हॉस्पिटल (ओटी) व शासकीय आयुर्वेदिक कॉलेज व रुग्णालय मिळून ३,८२५ शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. परंतु या सर्वांना मिळूनही लक्ष्य पूर्ण करता आले नाही. २,९४६ शस्त्रक्रियाच केल्या.

एनजीओ हॉस्पिटलही उदासीन
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या  एनजीओ हॉस्पिटलच्या यादीत डॉ. महात्मे आय कॅम्प नागपूरला ३६२५ मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. परंतु यां हॉस्पिटलने केवळ ३२ टक्के म्हणजे ११७६ शस्त्रक्रिया केल्या. एन.के. हॉस्पिटल व लता मंगेशकर हॉस्पिटलला १८०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य होते. या दोन्ही हॉस्पिटलने ७७ टक्के म्हणजे १३८७ शस्त्रक्रिया केल्या. सूरज आय इन्स्टिट्यूटला १२०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य देण्यात आले होते या इस्पितळाने फक्त २० टक्केच लक्ष्य पूर्ण करीत २४१ शस्त्रक्रिया केल्या. योगीराज हॉस्पिटल, रामटेकला ५५० शस्त्रक्रियेचे लक्ष्य देण्यात आले होते. या हॉस्पिटलने सर्वात कमी म्हणजे ९८ शस्त्रक्रिया केल्या. एस.व्ही. मिशन खापरीला ६०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले असताना १२७ शस्त्रक्रिया तर इव्हिस्टा आय केअर हॉस्पिटलला ६०० शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले असताना १२६ शस्त्रक्रिया केल्या.

Web Title: National Blindness Reduction Program fails in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.