सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीयांची मान स्वाभिमानाने ताठ झाली : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:31 AM2018-11-25T01:31:39+5:302018-11-25T01:34:28+5:30

दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मिरात निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेतला. शूर सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली. यामुळे भारतीयाची मान स्वाभिमानाने ताठ झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.

Nitin Gadkari: Pride of India because of its surgical strike! | सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीयांची मान स्वाभिमानाने ताठ झाली : नितीन गडकरी

सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीयांची मान स्वाभिमानाने ताठ झाली : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देकारगिल युद्धाचे प्रमुख लेफ्नंट जनरल राजेंद्र निंभोकर यांना विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मिरात निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेतला. शूर सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली. यामुळे भारतीयाची मान स्वाभिमानाने ताठ झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.
कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्व.माणिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भाच्या विकासासाठी भरीव कार्य करणाºयांना किंवा विदर्भाचा लौकिक राज्य किंवा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविणाऱ्यांना ‘विदर्भ गौरव पुरस्कार ’ प्रदान केला जातो. श्रीमंत धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमात यंदाचा हा पुरस्कार कारगिल युद्धाचे प्रमुख व सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल(निवृत)राजेंद्र निंभोरकर यांना नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष एअर मार्शल शिरीष देव, मेजर जनरल राजेश कुंद्रा, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, कृ षी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर, नगरसेवक निशांत गांधी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, देशासाठी लढणाऱ्या शूर पुत्राचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. युद्ध वा संघर्ष कुणालाही नको आहे. परंतु सामर्थ्यवानच शांतता प्रस्थापित करू शकतो. भारताची भूमिका शांततेची असली तरी संरक्षणाच्या बाबतीत आपण सामर्थ्यवान असलेच पाहिजे. यासाठी भारतीय सैन्य आंतरराष्ट्रीय दर्जाने सुसज्ज केले जात आहे. पाकिस्तानला भारताने तीनवेळा युद्धात पराभूत केले. परंतु दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. या कृ त्याचा धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेण्यात आला.
विकास सिरपूरकर म्हणाले, सैनिकांचे आयुष्य वेगळेच असते. विपरित परिस्थितीचा सामना करीत देशाच्या सीमेचे संरक्षण करतात. शिवाजी सर्वांनाच हवा आहे. पण तो बाजूच्या घरात हवा, अशी लोकांची मानसिकता होती. हळुहळू यात बदल होत आहे. मराठी तरुणांची सैन्यात संख्या वाढली आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी कृषी विकास प्रतिष्ठानने २८ लाख खर्च केले ही कौतुकास्पद बाब आहे. राजेंद्र निभोंरकर यांची नागपूरला, विदर्भाला गरज आहे. येथील युवकांना तुम्ही स्फूर्ती द्या असे आवाहन करून सिरपूरकर यांनी भारत -चीन युद्धातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा दिला.
निभोंरकर यांची सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका होती. यातून युवकांना प्रेरणा मिळेल. इतिहासात याची नोंद राहील असे प्रतिपादन रवींद्र ठाकरे यांनी केले. नागपूरच्या भूमीत राष्ट्रीयत्वाची भावना रुजलेली असल्याचे राजेश कुंद्रा यांनी सांगितले. राजेंद्र निंभोरकर यांच्या यशात त्यांची पत्नी शिला निंभोरकर यांचेही योगदान असल्याचे शिरीष देव म्हणाले. राजेंद्र निंभोरकर यांनी विदर्भ गौरव पुरस्कार स्वीकारल्याने या पुरस्काची प्रतिष्ठा वाढल्याचे गिरीश गांधी यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सोमेश्वर पुसदकर यांनी तर सूत्र संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार निशांत गांधी यांनी मानले.
सर्जिकल स्ट्राईकमुळे जगाला भारताचे सामर्थ्य कळले
आपण सर्वांना भारतीय सेनेचा अभिमान वाटायला हवा. सैन्यावर आपल्याला गर्व असायला हवा, सैन्यावर शंका बाळगू नका, खोटे बोलणे हा सैन्याचा धर्म नाही. सैन्यात सर्वधर्मसमभाव आहे. सर्जिकल स्ट्राईकमुळे अमेरिका, रशिया यासारख्या बलाढ्य राष्ट्रासह जगाला भारताचे सामर्थ्य कळले. असे मनोगत लेफ्टनंद जनरल(निवृत्त)राजेंद्र निंभोरकर यांनी सत्काराच्या उत्तरात व्यक्त केले. दहशतवाद्याच्या हल्ल्यात आपले १९ जवान शहीद झाले होते. हा एक प्रकारे देशावरच आघात होता. यापूर्वीही मुंबईसह देशभरात दहशतवाद्यानी ठिकठिकाणी कारवाया केल्या. पाकिस्तनला धडा शिकवण्याची गरज होती. यातूनच सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला. शत्रूच्या सीमेत ७ ते ८ किलोमीटर आत घुसून ३ ते ४ तासात एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी ही मोहीम फत्ते करण्यात आली. याची मोजक्याच लोकांना कल्पना होती. अशी माहिती निभोंरकर यांनी दिली.

 

Web Title: Nitin Gadkari: Pride of India because of its surgical strike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.