नागपूर मनपाची तिजोरी रिकामी; डांबर मिळेना, खड्डे बुजेनात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:38 PM2018-10-06T12:38:17+5:302018-10-06T12:39:36+5:30
नागपूर मनपाची तिजोरी रिकामी असल्याने डांबर व गिट्टीच्या खरेदीबरोबरच मजुरांची व्यवस्था यासंदर्भातील फाईल मंजुरीसाठी अडकली आहे.
राजीव सिंह।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: पावसाळा थांबल्यानंतर आॅक्टोबरच्या सुरुवातीपासून शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात येते. परंतु मनपाची तिजोरी रिकामी असल्याने डांबर व गिट्टीच्या खरेदीबरोबरच मजुरांची व्यवस्था यासंदर्भातील फाईल मंजुरीसाठी अडकली आहे. महिनाभराचा उशीर झाल्यानंतर आॅक्टोबरच्या सुरुवातीला हॉटमिक्सशी संबंधित फाईलला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अपेक्षित सुरुवात झालेली नाही.
हॉटमिक्ससाठी डांबर खरेदी करण्याकरिता अॅडव्हान्स रक्कम द्यावी लागते. परंतु रोखीची कमी असल्यामुळे डांबर खरेदीसाठी रोख रक्कम उपलब्ध होऊ शकली नाही. जे डांबर वाचले होते त्यातून कसेतरी काम सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विभागाकडे केवळ ७ ते ८ दिवस पुरेल इतकेच डांबर शिल्लक आहे. हे लक्षात घेता घाईघाईत फाईल स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे.
जेव्हा की प्रशासकीय प्रक्रिया कधीचीच पूर्ण करण्यात आली होती. रस्त्यावरील खड्ड्यासंदर्भात जनतेतून ओरड होत असल्यामुळे ७.५० लाख रुपयांचा चेक विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मात्र स्थायी समितीत डांबर खरेदीसाठी ४० लाख १६ हजार ५६० रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, गिट्टीचा दीड महिन्याचा स्टॉक आहे. मजुरी व वाहतुकीची समस्या नाही, परंतु डांबरामुळे कुठलेच काम करता येऊ शकत नाही. हॉटमिक्स एमआयडीसी हिंगणाच्या प्लॅण्टसाठी संबंधित डांबर एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल रिफायनरी मुंबई येथून खरेदी करण्यात येते. हॉटमिक्स प्लॅण्ट विभागाकडून १२ मीटर चौरस खड्डे बुजविण्यात येतात. विशेष म्हणजे स्थायी समितीमध्ये गिट्टीसाठी २.३१ कोटी व मजुरीसाठी ४३.३६ लाख रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे.
कोल्ड मिक्सद्वारे बुजविले खड्डे
जून ते सप्टेंबर दरम्यानच्या काळात केवळ गणेशोत्सवात काही रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करण्यात आले. कोल्ड मिक्सद्वारे खड्डे बुजविण्यात आले. गिट्टी व मुरुमाद्वारे तातपुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्यात आले. ताजाबादमध्ये ऊर्स असल्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम शुक्रवारी करण्यात आले. यापूर्वी फुटाळा, गांधीसागर, सक्करदरा तलावाच्या रस्त्यावर पॅचवर्क करण्यात आले. एकूणच हॉटमिक्स विभाग वेळ काढण्याचा प्रयत्न करतो आहे.