पोलीस भरतीचे रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:54 AM2017-11-14T00:54:36+5:302017-11-14T00:55:02+5:30
बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणाºया टोळीने पोलीस आणि दुसºया शासकीय विभागात अनेक युवकांना नोकरी मिळवून दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणाºया टोळीने पोलीस आणि दुसºया शासकीय विभागात अनेक युवकांना नोकरी मिळवून दिली आहे. राज्यभरात पसरलेल्या या रॅकेटने बेरोजगार युवकांना जाळ््यात ओढून कोट्यवधी रुपये कमविले असून शासकीय यंत्रणेचीही दिशाभूल केली आहे. या रॅकेटची सखोल चौकशी केल्यास अनेक दिग्गजांची नावे समोर येऊ शकतात. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या सदर पोलिसांनी माजी सैनिक कल्याण मुरकुटे (३०) रा. गंगाखेड परभणी आणि त्याचा साथीदार आतिश चव्हाण (३५) रा. नांदेड यास अटक केली आहे.
गंगाखेड परभणी येथील रहिवासी भारत हाके (२४) याने बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या माध्यमातून २०१६-१७ च्या ग्रामीण भरतीत शिपाई पदाची नोकरी मिळविली. त्याची तक्रार मिळाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र तपासणीसाठी क्रीडा संचालनालय, पुणेकडे पाठविण्यात आले. तेथे ते बनावट असल्याचे माहीत झाल्यानंतर २१ आॅगस्टला हाकेला अटक करून सदर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सूत्रांनुसार हाकेने चौकशीत कल्याण मुरकुटे, आतिश चव्हाण, संतोष कठाळे यांची नावे सांगितली. तिघांनी हाकेला बनावट प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले होते. हाकेला अटक झाल्याचे कळताच तिघेही फरार झाले. त्यांचे साथीदारही भूमिगत झाले होते. या टोळीने क्रीडा क्षेत्राशी निगडित शेकडो बेरोजगार युवकांकडून तीन लाख रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. हा गोरखधंदा मागील चार ते पाच वर्षांपासून सुरू होता. परंतु या वर्षी सरकारच्या एका अध्यादेशामुळे अनेकजण नोकरी मिळविण्यात यशस्वी झाले. क्रीडासाठी राखीव जागेतून ज्यांना नोकरी मिळते त्यांचे प्रमाणपत्र तपासणीसाठी क्रीडा संचालनालय पुणे येथे पाठविण्यात येते. तेथून अहवाल आल्यानंतर त्यांना नेमणूक देण्यात येते. हा अहवाल येण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना नेमणुकीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागते. क्रीडा संघटनांनी याची शासनाकडे तक्रार केली. सरकारने एक अध्यादेश काढून स्थानिक क्रीडा उपसंचालकांना प्रमाणपत्र तपासण्याचे अधिकार दिले. पोलीस भरतीच्या नियमानुसार क्रीडा उपसंचालकांनी पात्र ठरविलेले उमेदवारच भरतीसाठी अर्ज करू शकतात. हाके किंवा त्याच्यासारखे उमेदवार क्रीडा उपसंचालकांद्वारे प्रमाणपत्र साक्षांकित केल्याचा बनावट अहवाल सादर करून भरती प्रक्रियेत सहभागी झाले. बनावट खेळाडूंना नोकरी मिळाल्यामुळे खºया खेळाडूंमध्ये खळबळ उडाली. त्यांनी चौकशी केली असता बनावट प्रमाणपत्राचे प्रकरण उजेडात आले. सूत्रांनुसार बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नागपूर ग्रामीण पोलीस, तुरुंग, गडचिरोली, मुंबई पोलीस, आरोग्य, वन, महसूल विभाग आणि स्थानिक संस्थात अनेक युवकांनी नोकरी मिळविली आहे. बनावट उमेदवारांनी नोकरी मिळविल्यामुळे खºया खेळाडूंसोबत अन्याय झाला. अनेक खेळाडूंची भरती होण्याची अखेरची संधी होती. या बाबत शासकीय अधिकाºयांना अनेक वर्षांपासून माहिती होती. त्यांच्याकडे संबंधित उमेदवारांनी तक्रारही केली होती. परंतु त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही.
या टोळीची पाळेमुळे खूप खोलवर गेलेली आहेत. त्यामुळे सत्यस्थिती बाहेर येऊ दिल्या जात नाही. अटक करण्यात आलेला कल्याण मुरकुटे माजी सैनिक आहे. आतिश चव्हाणचे वडील शासकीय नोकरीत आहेत. संतोष कठाळेही सरकारी कर्मचारी आहे. आतिशचा नातेवाईक शहर पोलिसात अधिकारी आहे. अशा स्थितीत तो स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.
नोकरी करण्यास केली मनाई
सदरमध्ये गुन्हा दाखल होताच तुरुंगात जाण्याच्या भीतीमुळे बनावट खेळाडूंनी नोकरी न करण्याची इच्छा व्यक्त केली. यात तुरुंग भरतीतील तीन कर्मचाºयांचा समावेश आहे. सूत्रांनुसार तुरुंग प्रशासनाला नोकरी करणार नसल्याचे लेखी देऊन तीन कर्मचारी नागपुरातून गायब झाले आहेत. इतर ठिकाणीही बनावट खेळाडूंनी याच पद्धतीने प्रशासनाकडे लेखी अर्ज सादर केले. तज्ज्ञांच्या मते बनावट खेळाडूंनी शासनाची फसवणूक केल्यामुळे अशाप्रकारे अर्ज करण्याला काहीच महत्त्व नाही.
संकटात अडकले बेरोजगार
या रॅकेटचा शिकार झालेल्या बेरोजगारांसमोर मोठे संकट आहे. नोकरीसाठी बनावट प्रमाणपत्र मिळविण्यात त्यांचे तीन लाख रुपये खर्च झाले. फसवणुकीचे प्रकरण उजेडात आल्यामुळे भविष्यात नोकरी लागण्याची आशा नाही. अशा स्थितीत त्यांनी आरोपींकडून पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी आणि त्यांच्या साथीदारांकडून कोणताच प्रतिसाद त्यांना मिळत नाही. बनावट प्रमाणपत्र जवळ ठेवणे धोकादायक आहे. यामुळे त्यांची स्थिती एकीकडे आड दुसरीकडे विहीर अशी झाली आहे. यातील बहुतांश उमेदवार गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत.