विदर्भात दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:54 AM2018-10-04T11:54:03+5:302018-10-04T11:54:44+5:30
पावसाळा आता संपत आला आहे. विभागातील मोठी जलाशये कोरडी आहेत. जलाशयांमध्ये केवळ ४६.२४ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.
आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळा आता संपत आला आहे. विभागातील मोठी जलाशये कोरडी आहेत. जलाशयांमध्ये केवळ ४६.२४ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरीतील पाण्याची पातळी आधीच खोल गेली आहे. तेव्हा येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास भविष्यात पूर्व विदर्भात दुष्काळाचा धोका निर्माण झाला आहे.
नागपूर विभागात एकूण १८ मोठी जलाशये आहेत. यांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. या आजच्या घडीला (१ आॅक्टोबर रोजी नोंदविल्यानुसार) केवळ १६४३.३९ दलघमी म्हणजेच ४६.२४ टक्के इतका साठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील मोठ्या जलशयामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची साठा क्षमता १०१६.८८ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३०५.१८ म्हणजेच ३०.०१ टक्के इतका साठा आहे. कामठी खैरीमध्ये ३८.१२ टक्के, रामटेकमध्ये ४५.३९ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूरमध्ये ६७.८९ टक्के, इटियाडोह ५२.७२ टक्के, पुजारीटोला ७१.९५ टक्के, कालीसरार ६०.२४ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा-२ मध्ये ३७.२१ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ८६.९३ टक्के, गडचिरोलीतील दीना प्रकल्पात ६९.१३ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर धरणात ३१.६१ टक्के, धाम प्रकल्पात ४०.७३ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ मध्ये ३१.४६ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द ४९.८२ टक्के, बावनथडी ४६.८२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा पाहता पाण्याच्या नियोजनाचा विचार केल्यास नागपूर विभागात तीव्र पाणीटंचाईचा धोका आहे.
वणा-पोथरा १०० टक्के भरले
१८ मोठ्या प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातील केवळ लोवर नांद, वणा आणि वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. परंतु या धरणाची एकूण साठाक्षमताच कमी आहे. लोवर नांद, वणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ५३ दलघमी इतकी आहे. तर पोथरा प्रकल्पाची एकूण पाणीसाठा क्षमता केवळ ३५ दलघमी इतकी आहे. त्यामुळे ती पूर्ण भरली असली तरी भविष्यातील टंचाईचा सामना करण्यास पुरेशी ठरणार नाही.
प्रचंड मोठा दुष्काळ पडू शकतो
पावसाळ्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी आधीच खाली गेली आहे. विदर्भातील बहुतांश शेती ही विहिरीवरच अवलंबून आहे. त्यामुळे पिकांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. खरीपातील काही पिके निघून जतील. परंतु रबीची पिके पाण्याअभावी नष्ट होतील. गहू, चणा, सूर्यफूल, फळबागा यांना मोठा फटका बसेल. कारण पिण्यासाठी पाणी ठेवले जाईल. शेतीला पाणी मिळणार नाही. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचीही मोठी टंचाई भासेल. येत्या काही दिवसात चंगला पाऊस झाला तर ठीक नाही तर प्रचंड मोठा दुष्काळ पडेल, हे निश्चित. यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.
- श्रीधर ठाकरे , कृषितज्ज्ञ, अध्यक्ष-महाआॅरेंज