प्रधानमंत्री ग्राम सडक योजना; टोल वाचविण्यासाठी शोधला मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:38 AM2019-05-10T10:38:44+5:302019-05-10T10:40:53+5:30
नागपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ते उखडले आहेत.
फहीम खान।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ते उखडले आहेत. ‘लोकमत’चमूने या परिसराची पाहणी केली असता, पेवठा ते बनवाडी मार्गावर बनविण्यात आलेला टोल नाका वाचविण्याच्या प्रयत्नात जड वाहनांची वर्दळ या रस्त्यांवर वाढली आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांत या परिसरातील रस्ते नादुरुस्त झाले असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
हजारो रुपयांची बचत
टोल नाक्यावर ट्रक चालकांकडून ८०० रुपये एका फेरीचे घेतले जातात. या रस्त्यावरून दिवसभरात एकाच कंपनीचे डझनभर ट्रक ये-जा करीत असतात. त्यामुळे टोलसाठी हजारो रुपये खर्च करावे लागात. परंतु जेव्हापासून झरी मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू केली तेव्हापासून हजारो रुपयांच्या टोल टॅक्सची बचत होत असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले.
बॅरिकेडस् तोडले
टोल वाचविण्याच्या प्रयत्नात या रस्त्यावरून जड वाहनांची झरी रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. याचा विचार करता स्थानिक नागरिकांनी बनवाडी गावाच्या वळणावर बॅरिकेडस् लावले होते. परंतु वाहन चालकांनी लोखंडी बॅरिकेडस् काढून टाकले. आता या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक बेरोक-टोक वाहतूक सुरू आहे. बनवाडी पंचायतकडे ग्रामस्थांनी याची तक्रार केली होती. परंतु पंचायतच्या पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बनविण्यात आलेला रस्ता नादुरुस्त झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत.
पाच वर्षांच्या देखभालीला अर्थच काय?
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बनविण्यात आलेल्या रस्त्यावर फलक लावण्यात आला आहे. यावर रस्त्याची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असल्याचे लिहिले आहे. परंतु २०१४ ला बनविण्यात आलेल्या या रस्त्याची तीन वर्षातच अवस्था गंभीर झालेली आहे. रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडली आहे. जागोजागी खड्डे आहेत. असे असूनही कंत्राटदार दुरुस्ती करीत नाही. यासंदर्भात संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. परंतु कंत्राट देताना असलेल्या अटी व शर्तीनुसार संबंधित कंत्राटदार रस्त्याची देखभाल व दुरुस्ती का करीत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.