नागपूरच्या गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटीच्या कुंटणखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 08:59 PM2019-02-07T20:59:32+5:302019-02-07T21:01:17+5:30
गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटी ऊर्फ कल्लोबाई साहिबसिंग धनावत (वय ५३) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी सायंकाळी छापा घातला. येथे कल्लोबाई तिच्या दलालाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघडकीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटी ऊर्फ कल्लोबाई साहिबसिंग धनावत (वय ५३) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी सायंकाळी छापा घातला. येथे कल्लोबाई तिच्या दलालाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघडकीस आले.
लकडगंजमधील रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाजमुना वस्तीत कल्लोबाई गेल्या अनेक वर्षांपासून कुंटणखाना चालविते. ती अलीकडे अपहरण करून आणलेल्या अल्पवयीन मुलींना दलालांकडून विकत घेते आणि त्यांना कुंटणखान्यावर डांबून ठेवले जाते. त्यांच्यावर अन्वन्वित अत्याचार केल्यानंतर त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे छापा घातला. पोलिसांना यावेळी एक अल्पवयीन मुलगी कल्लोबाईच्या कुंटणखान्यावर आढळली. पोलिसांनी त्या मुलीची सुटका करून कल्लोबाईविरुद्ध लकडगंज ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक पोलीस निरीक्षक अनुपमा जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, एएसआय अजय जाधव, हवलदार शितलप्रसाद मिश्रा, हवालदार विजय गायकवाड, प्रल्हाद डोळे, छाया राऊत, साधना चव्हाण, चालक अनिल दुबे, सामाजिक कार्यकर्त्या विजयाराणी रेड्डी, डॉ. अनुपमा मिश्रा यांनी ही कामगिरी बजावली.