हेडगेवार रक्तपेढी राज्यात दुसरी
By Admin | Published: February 21, 2017 02:20 AM2017-02-21T02:20:37+5:302017-02-21T02:20:37+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीद्वारा संचालित डॉ. हेडगेवार रक्तपेढी ही गरजूंना गरजेच्या वेळी सवलतीत रक्त मिळवून देते. रुग्णाचा जीव वाचावा,
अशोक पत्की यांची माहिती : दरमहा ४७ थॅलेसिमिक रुग्णांना नि:शुल्क रक्त
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीद्वारा संचालित डॉ. हेडगेवार रक्तपेढी ही गरजूंना गरजेच्या वेळी सवलतीत रक्त मिळवून देते. रुग्णाचा जीव वाचावा, हाच उद्देश असतो. रक्तपेढीतर्फे दरमहा ४७ थॅलेसिमिक रुग्णांना नि:शुल्क रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. म्हणूनच रक्तपेढीला राज्यातून दुसरा क्रमांक मिळाला आहे. अशी, माहिती डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, दत्ताजी टेकाडे, प्रकाश कुंडले, हरीभाऊ इंगोले, श्रीकांत विंचुर्णे, मोहन गोखले, प्रकाश कुंटे आदी उपस्थित होते. पत्की म्हणाले, मागील २३ वर्षांपासून रक्तपेढीच्या माध्यमातून जनसेवा सुरू आहे. वर्धा, गोंदिया, भंडारा, वरुड यासह पाच ठिकाणी रक्त स्टोरेज करण्याची सोय आहे. याशिवाय आणखी चंद्रपूर, रामटेक, काटोल, पूर्व नागपूर व ब्रह्मपुरी आदी पाच ठिकाणी ‘स्टोरेज’ केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहेत. मागील वर्षी ४२५ विविध शिबिरांच्या माध्यमातून तब्बल २४ हजार २२३ रक्तपिशव्या गोळा करण्यात आल्या. एकूण ४० हजारांवर रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आले. रक्तपेढीकडे ६० हजार रक्तदाते उपलब्ध आहेत. यामुळे गरजेच्या वेळी कुठलेही रक्तगट उपलब्ध होणे शक्य होते. रक्तपेढीच्या माध्यमातून जनसेवा व सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविले जात असल्याने राज्यात २९० रक्तपेढीतून नागपूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीला दुसरा क्रमांक मिळाला आहे.(प्रतिनिधी)
रक्तपेढीचे नवीन वास्तूत स्थानांतरण उद्या
डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे नवीन वास्तूत स्थानांतरण होत आहे. याचा लोकार्पण सोहळा २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रामनगर चौकातील रामनगर मैदानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती डॉ. दिलीप गुप्ता यांनी दिली.