रेल्वे शौचालयात बेशुद्ध ज्येष्ठ नागरिकाला वाचविले; नागपुरातील सुरक्षा दल जवानांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 09:57 AM2018-01-04T09:57:01+5:302018-01-04T09:58:01+5:30
महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या ज्येष्ठ नागरिकावर त्वरित प्रथमोपचार करून त्याचा जीव वाचविण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या ज्येष्ठ नागरिकावर त्वरित प्रथमोपचार करून त्याचा जीव वाचविण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी केले.
बुधवारी सायंकाळी ५.२० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर उभ्या असलेल्या कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये आरपीएफचे जवान संजय खंडारे, गोपाल सिंह हे गस्त घालत होते. त्यांना एस ५ कोचच्या दाराजवळ एक महिला घाबरलेल्या अवस्थेत रडताना दिसली. तिची चौकशी केली असता तिने आपले पती घनश्याम बोधवानी (७०) रा. माताटोली, गोंदिया आजारी असून ते शौचासाठी गेले होते, परंतु बराच वेळ होऊनही परतले नसल्याची माहिती दिली. दार वाजविल्यानंतरही ते प्रतिसाद देत नसल्याचे त्या महिलेने सांगितले. त्यावर आरपीएफ जवानांनीही दार ठोठावले, परंतु त्यांनाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी शौचालयाच्या जाळीतून आत पाहिले, परंतु त्यांना काहीच दिसले नाही. अखेर त्यांनी जाळी तोडून आत हात घालत शौचालयाचे दार उघडले. दार उघडताच बोधवानी बेशुद्ध अवस्थेत खाली पडलेले दिसले. लगेच त्यांना उचलून सीटवर ठेवण्यात आले. त्यांच्या तोंडावर पाणी मारले असता त्यांनी हालचाल केली व ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना त्यांचे औषध देण्यात आले. काही वेळानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यांनी त्याच गाडीने पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली.