विद्यापीठात शिवरायांचा पुतळा बसविणार
By admin | Published: May 1, 2017 01:09 AM2017-05-01T01:09:17+5:302017-05-01T01:09:17+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत परिसरात शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
हालचाली वेगात : पालकमंत्र्यांनी घेतली माहिती
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत परिसरात शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हा प्रस्ताव जुनाच असला तरी आता यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील याबाबत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
२००७ साली विधीसभेच्या बैठकीत शिवाजी महाराज शैक्षणिक परिसरात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा यासंदर्भातील प्रस्ताव आला होता. डॉ. प्रशांत कडू यांनी हा प्रस्ताव मांडला होता. विधीसभेने या प्रस्तावाला मान्यता दिली होती व तत्कालीन ‘बीसीयूडी’ संचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीदेखील तयार करण्यात आली होती. त्यानंतर बरेच वर्ष हा प्रस्ताव थंडबस्त्यात पडला. डॉ.विलास सपकाळ हे कुलगुरू असताना २०१५ साली एक समिती तयार करण्यात आली होती. ३० डिसेंबर २०१६ रोजी तत्कालीन ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली होती व पुतळा बसविण्यासंदर्भातील मुद्यावर शिक्कामोर्तब झाले होते.
याबाबत पालकमंत्र्यांनी शनिवारी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. प्रभारी कुलसचिव व विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांनी विद्यापीठातील घडामोडींची माहिती दिली. पालकमंत्र्यांनी प्रस्तावाची माहिती घेत, त्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर ठेवणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)
१५ लाखांचा खर्च अपेक्षित
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा नेमका किती मोठा राहील हे ठरविण्यात आलेले नाही. मात्र या पुतळ्यासाठी व सौंदर्यीकरणासाठी १५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी कुठून जमा करायचा याबाबत नंतर चर्चा करण्यात येईल. अगोदर आराखडा तयार करा, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराज बाग चौकात डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पुतळा आहे. त्यालाच समांतर विद्यापीठाच्या टोकावर हा पुतळा उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.