गोसेखुर्दसह सात सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:53 AM2017-11-04T00:53:36+5:302017-11-04T00:53:48+5:30
नागपूर व अमरावती विभागातील मुख्यमंत्री यांच्या वाररूममध्ये प्राधान्यक्रम असलेल्या गोसेखुर्दसह निम्न वर्धा, बेंबळा, खडकपूर्ण, निम्न पेढी, डोंगरगाव, बावनथडी या सात प्रकल्पांची कामे .....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व अमरावती विभागातील मुख्यमंत्री यांच्या वाररूममध्ये प्राधान्यक्रम असलेल्या गोसेखुर्दसह निम्न वर्धा, बेंबळा, खडकपूर्ण, निम्न पेढी, डोंगरगाव, बावनथडी या सात प्रकल्पांची कामे येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्यानुसार प्रकल्पनिहाय निधीचे नियोजनसुध्दा करण्यात आले असल्याची माहिती विदर्भ सिंचन महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी दिली.
सिंचन भवन सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित माध्यम संवाद या कार्यक्रमात अविनाश सुर्वे बोलत होते. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, अधीक्षक अभियंता जी.एम. शेख, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
सुर्वे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले असून त्यासाठी वाररूम तयार करून प्रत्येक प्रकल्पांचा आढावा घेऊन प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे ठरविले आहे. विदर्भातील १९ प्रकल्प या वाररूम मध्ये घेण्यात आले आहेत. त्यामध्ये बावनथडी मोठा प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प डिसेंबर २०१७ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे.
दर्जेदार पुनर्वसनासाठी २५० कोटी रुपये
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये दर्जेदार पुनर्वसन तसेच नागरी सुविधा, पिण्याच्या पाण्याचा बारमाही पुरवठा, रस्त्यांच्या सुविधा, सांडपाणी व्यवस्था, तसेच शाळांच्या दुरुस्तीसह आदर्श पुनर्वसनासाठी २५० कोटी रुपये मिळाले आहे. आॅगस्ट २०१८ पर्यंत पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्यानंतर गोसेखुर्द प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होईल. यामुळे नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
केंद्र सरकारच्या एनबीसीसीकडे काम
शासनाने केंद्र शासनांतर्गत असलेल्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) या संस्थेला गुणवत्ता व अंतर्गत नियोजनानुसार चांगले व दर्जेदार पुनर्वसन करण्यासोबत नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी नियुक्त केले असून सुमारे एक हजार कोटी रुपयाचे काम ही संस्था करणार आहे. यामध्ये २०० कोटी रुपयांचे काम नागरी सुविधांची असून ८०० कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्पांची कामे ही संस्था करणार आहे.
बंदिस्त पाईपद्वारे शेतापर्यंत पाणी
कालव्याकरिता पाईपद्वारे सिंचन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेद्वारे जून २०२० पर्यंत १५६,००० हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ पोहोचविण्याचे नियोजन आहे. यासोबतच बंदिस्त पाईपद्वारेच बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पावरील १२ उपसा सिंचन योजनांवर अंमबजावणी करून १ लाख हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ मिळेल. निम्न वर्धा अंतर्गत आर्वी तसेच गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत ५ उपसा सिंचन योजना करण्याचे नियोजन असल्याचेही अविनाश सुर्वे यांनी सांगितले. यात पाईपद्वारे थेट शेतापर्यंत पाणी पोहोचवता येणार आहे.