भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा लैंगिक शोषण: आरोपीला अटक
By Admin | Published: May 3, 2014 01:23 PM2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T16:45:45+5:30
वासनांध भावाने चुलत बहिणीवरच लैंगिक अत्याचार करून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. नंंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नागपूर : वासनांध भावाने चुलत बहिणीवरच लैंगिक अत्याचार करून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. नंंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी संजय (२०) (काल्पनिक नाव) हा बारावीचा विद्यार्थी आहे, तर पीडित मुलगी ही त्याची चुलत बहीण असून ती दहावीत आहे. दोन्ही कुटुंबे वडिलोपार्जित एकाच इमारतीत राहतात. खालच्या भागात संजयचे तर वरच्या भागात पीडित मुलीचे कुटुंब राहते. मुलीचे आई-वडील सकाळी कामावर जातात तर इतर भावंड सकाळी ९ वाजता शाळेत जातात. मुलगी दुपारी १२ वाजता शाळेसाठी बाहेर पडते. सकाळी ९ ते दुपारी १२ या काळात संजयने मुलीवर अत्याचार केला. ऑगस्ट २०१३ पासून हा किळसवाणा प्रकार सुरू होता. त्यातून मुलगी गर्भवती झाली. ही बाब संजयच्या आई-वडिलांना समजली. त्यांनी दीड महिन्यापूर्वी तिला गर्भपात करायला लावला.
दरम्यान मुलीच्या वागणुकीत अचानक झालेल्या बदलाने तिच्या आई-वडिलांना संशय आला. चौकशीत मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर बुधवारी त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार पाहून पोलिसही थक्क झाले. त्यांनी आरोपी संजयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मुलीला जबरदस्तीने गर्भपात करण्यासाठी बाध्य केल्याच्या आरोपावरून संजयच्या आई-वडिलांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार वर्षांपूर्वी संजयने पाचपावलीत एका कोचिंग क्लासच्या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र अल्पवयीन असल्याने तो न्यायालयातून बचावला. संजय विकृत मनोवृत्तीचा असल्याचा संशय आहे.
नंदनवनवर नजर
बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे नंदनवन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी चिंतित आहेत. सोमवारी एका अल्पवीयन मुलीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण उघड झाले. त्यानंतर बापानेच सावत्र मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले. आता चुलतभावानेच लैंगिक अत्याचार करण्याची घटना घडली आहे. (प्रतिनिधी)