नागपुरात सुरक्षेचे धडे देणारे ‘सिम्युलेटर’ धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:45 PM2018-01-16T23:45:04+5:302018-01-16T23:46:14+5:30
अपघात टाळण्यासाठी एसटीच्या चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे धडे देण्यासाठी नागपूर विभागीय कार्यालयात ‘सिम्युलेटर’ हे अद्ययावत यंत्र तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले. परंतु तेव्हापासून हे यंत्र धूळखात पडले आहे. हे यंत्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नसल्यामुळे एसटी महामंडळाचे प्रशासन सुरक्षेप्रति उदासीन असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघात टाळण्यासाठी एसटीच्या चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे धडे देण्यासाठी नागपूर विभागीय कार्यालयात ‘सिम्युलेटर’ हे अद्ययावत यंत्र तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले. परंतु तेव्हापासून हे यंत्र धूळखात पडले आहे. हे यंत्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नसल्यामुळे एसटी महामंडळाचे प्रशासन सुरक्षेप्रति उदासीन असल्याचे दिसून येते.
एसटी महामंडळाने आपल्या चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाईल असोसिएशन (डब्ल्यूआयएए) या संस्थेच्या मदतीने १८ डिसेंबर २०१४ रोजी ‘सिम्युलेटर’ नागपुरात सुरू केले. ज्या चालकाच्या हातून अपघात झाला, त्या चालकांना ‘सिम्युलेटर’ द्वारे प्रशिक्षण देण्याची एसटी महामंडळाची योजना होती. वाहन चालविताना कुठे ब्रेक मारावा, कधी गेअर बदलावा, ओव्हरटेक करताना काय काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण ‘सिम्युलेटर’ या यंत्राद्वारे देण्यात येणार होते. परंतु विभागीय कार्यालयात एका कक्षात हे सिम्युलेटर बसविले तेव्हापासून धूळखात पडलेले आहे. नागपूर विभागात दरवर्षी जवळपास एसटी १०० अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्यांदा नागपुरात ३० लाख रुपये किमतीचे ‘सिम्युलेटर’ बसविले. त्याचे उद्घाटनही नव्यानेच परिवहन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रयोग राज्यभरात सुरू करण्याची घोषणाही यावेळी रावते यांनी केली होती. परंतु उद्घाटनापासूनच हे यंत्र कुलूपबंद असल्यामुळे विभागातील एकाही चालकाला या यंत्राद्वारे प्रशिक्षण मिळू शकलेले नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून हे ‘सिम्युलेटर’ का खरेदी करण्यात आले, असा सवाल एसटी महामंडळाच्या वर्तुळातून करण्यात येत आहे. अपघात टाळण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेले सिम्युलेटर सुरू करण्याची मागणी विभागातील कर्मचाºयांकडून होत आहे. बंद असलेल्या सिम्युलेटरबाबत एसटीचे विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
- सुरक्षेसाठी ‘सिम्युलेटर’ सुरू करणे गरजेचे
एसटी महामंडळाचे अपघात टाळण्यासाठी ‘सिम्युलेटर’ हे अद्ययावत यंत्र महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रशासनाने हे ‘सिम्युलेटर’ त्वरित दुरुस्त करून चालकांना वाहतुकीचे धडे देण्याची गरज आहे.
शशिकांत वानखेडे, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना