मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधानांकडे चला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:14 AM2018-02-24T01:14:31+5:302018-02-24T01:14:47+5:30
बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. यासोबतच शासनाकडे गेली ८४ वर्षे प्रलंबित असलेल्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीबाबत शासनाने प्रथमच सक्रियता दर्शवली आहे. आधीच ८४ वर्षे विलंब झालेल्या या मागणीच्या सकारात्मक पूर्तीसाठी शासनाने अधिक वेळ न घालवता त्वरित अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली एक उच्चाधिकार समिती त्या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी नेमावी अशीही विनंती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रात केली आहे.
महामंडळाच्या स्थापनेपासून आजवर शासनाकडे प्रलंबित अनेक ठराव, मागण्या , सूचना इ.
संबंधाने प्रत्यक्षात काही कृती शासनाने करावी व त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणीही महामंडळाने केली होती. तिलाही मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत महिनाभरात अशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याचेही स्मरण करून देत अशी बैठक उशिरात उशिरा ३० मार्चपूर्वी आयोजित करण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
... तर बेळगाववासीयांसोबत देणार धरणे
संमेलन समारोपप्रसंगी बेळगाववासीयांच्या संवेदनशील भावना प्रकट झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री यावर तोडगा काढतील, यावर आमचा विश्वास आहे. बैठक होईस्तो धीर धरू व महिनाभरात अशी बैठक न झाल्यास बेळगाववासी धरणे धरणार असल्यास आपणही त्यांच्यासोबत असू याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.