निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने विकले १०० वर कट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 10:56 AM2019-02-07T10:56:39+5:302019-02-07T10:57:09+5:30
कोलमाफिया शेख हाजी बाबा याच्या इशाऱ्यावर शस्त्रांची तस्करी करणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा संजय खरे याने पाच वर्षांत १०० पेक्षा अधिक कट्टे विकल्याचे उघडकीस आले आहे.
जगदीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोलमाफिया शेख हाजी बाबा याच्या इशाऱ्यावर शस्त्रांची तस्करी करणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा संजय खरे याने पाच वर्षांत १०० पेक्षा अधिक कट्टे विकल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या पाच वर्षांत हाजी आणि संजयने महाराष्ट्रासह शेजारी राज्यांतील गुन्हेगारांनाही शस्त्रे विकली आहेत. याची माहिती होताच एटीएस संजय आणि हाजीची पूर्ण कुंडली काढण्याच्या कामाला लागले आहे.
एटीएसने या टोळीचा पर्दाफाश करीत घुग्गुस (चंद्रपूर) येथील कोलमाफिया गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर, संजय खरे आणि बिहार येथील सुपत सिंग याला अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन कट्टे आणि २० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शस्त्र तस्करीच्या या टोळीचा मुख्य सूत्रधार हाजी आहे. त्याच्या इशाऱ्यावरच संजय खरे बिहारच्या मुंगेर जमालपूर येथून कट्टे व काडतुसे आणत होता. ते हाजीसह इतरांना उपलब्ध करून देत होता. हाजी ७ फेब्रुवारीपर्यंत एटीएसच्या ताब्यात आहे तर संजय खरेला मंगळवारी न्यायालयीन कोठडींतर्गत तुरुंगात पाठविण्यात आले. सूत्रानुसार हाजी आणि संजय मागील पाच वर्षांपासून शस्त्रांची तस्करी करीत आहेत. संजयचे बिहारमध्ये मजबूत नेटवर्क आहे. तो जमालपूरमधील उत्तम कट्टे बनविणाऱ्यांशी जुळलेला आहे. यामुळे त्याने आणलेली शस्त्रे विकत घेणारे मोठ्या प्रमाणावर असतात. संजय पाच वर्षांपूर्वीसुद्धा कट्ट्यासह सापडला होता. त्यावेळी संजय शस्त्राची ‘डिलिव्हरी’ द्यायला जात होता. यापूर्वीच तत्कालीन आंध्र प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर संजयने आपली कामाची पद्धत बदलविली. तो भरवशाच्या लोकांनाच शस्त्राची डिलिव्हरी देत होता. हाजी आणि संजयने शहर आणि ग्रामीण भागातील अनेक गुन्हेगारांना कट्टा आणि काडतुसे विकली आहेत. ग्रामीण भागात सक्रिय कोल तस्करीशी जुळलेले अनेक गँगस्टर्सला हाजीचे संरक्षण आहे. एटीएसने संजयकडून शहरात आणि ग्रामीण भागात पसरलेल्या नेटवर्कबाबत बरीच विचारपूस केली. परंतु तो शस्त्राच्या तस्करीबाबत काहीही सांगायला तयार नाही. हाजीनेसुद्धा अशीच भूमिका घेतली आहे.
गुप्तचर संस्थाही सक्रिय
शस्त्र तस्करी समोर आल्यानंतर गुप्तचर संस्था सक्रिय झाल्या आहेत. ते आरोपीची कसून चौकशी करीत आहे. शस्त्र तस्करासह त्यांचे इतर प्रकरणातील लिंकबाबतही तपासणी केली जात आहे. आरोपींनी यातून बरीच संपत्ती जमविली आहे.