पंजू तोतवानींचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता
By Admin | Published: March 30, 2017 02:53 AM2017-03-30T02:53:12+5:302017-03-30T02:53:12+5:30
खामला येथील शिवसेना नेते पंजू तोतवानी यांचा २२ वर्षीय मुलगा राहुल व त्याचे मित्र ९ जानेवारी २०१७ रोजीच्या मध्यरात्री ....
नागपूर : खामला येथील शिवसेना नेते पंजू तोतवानी यांचा २२ वर्षीय मुलगा राहुल व त्याचे मित्र ९ जानेवारी २०१७ रोजीच्या मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत होते. वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यांनी पोलिसांना सहकार्य केले नाही. पोलिसांसोबत अरेरावी करून त्यांच्यावर हात उगारला. पोलिसांना पाहून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला, असे स्पष्टीकरण हुडकेश्वर पोलिसांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्रावर सादर केले आहे.
पोलिसांच्या कारवाईविरुद्ध राहुल तोतवानी यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने पोलिसांचे स्पष्टीकरण लक्षात घेता पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर निश्चित केली. ९ जानेवारी २०१७ रोजी मध्यरात्रीनंतर एमएच-३१-ईके-२२२३ क्रमांकाच्या टाटा सफारी गाडीने तुकडोजी पुतळा ते मानेवाडा चौक या रोडवरील विजेच्या खांबाला धडक दिली होती. त्या गाडीत राहुल तोतवानी, त्याचे मित्र अंकुश गोविंद गुप्ता व राहुल रमेश चरडे हे बसले होते. या घटनेनंतर हुडकेश्वर पोलिसांनी तिघांनाही पोलीस ठाण्यात नेऊन जबर मारहाण केली.
न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना नातेवाईक, वकील आदींना भेटू दिल्या गेले नाही. त्यांना गुन्हेगारांपेक्षाही वाईट वागणूक देण्यात आली. त्यांच्याविरुद्ध खोटा एफआयआर नोंदविण्यात आला. यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करूनही हुडकेश्वर पोलिसांवर काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे आरोप याचिकेत करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाची सीबीआय किंवा सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, चौकशीत दोषी आढळून आलेल्या पोलिसांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा व राहुल तोतवानी यांना योग्य भरपाई देण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.
हुडकेश्वरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण आवटे यांच्या तक्रारीवरून राहुल व त्याच्या मित्रांविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ५०४, ५०६, २७९, ३२३ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रतीक शर्मा तर शासनातर्फे एम.जे. खान यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)