अवैध दारू धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम
By admin | Published: June 21, 2015 02:56 AM2015-06-21T02:56:27+5:302015-06-21T02:56:27+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांच्या विरुद्ध कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आता आपला मोर्चा अवैध दारू धंद्यांकडे वळविला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती टाळणार
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांच्या विरुद्ध कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आता आपला मोर्चा अवैध दारू धंद्यांकडे वळविला आहे. मुबईतील मालाड मालवण येथे विषारी दारू पिऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची पुनरावृत्ती आपल्या नागपुरात होऊ नये म्हणून याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नागपुरातील अवैध दारू धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे.
या मोहिमेची सुरुवात तशी गेल्या शुक्रवारीच करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कुर्वे यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपिया व निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली. आशिष दिवटे, शिवलाल गौर, आकाश सोनवाय, मनोज गौतेल यांच्या ताब्यातील १२२ लिटर मोहदारू व इतर साहित्यासह १०,०८२ रुपये किमतीचा माल तेव्हा जप्त करण्यात आला होता. दरम्यान, मुंबईतील मालाड मालवणची घटना घडली. तिथे हातभट्टीची दारू पिऊन तब्बल ८७ लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकारी कुर्वे यांनी घेतली आहे. नागपुरातही मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू काढली जाते. ही दारू आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याने एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अबकारी विभागांच्या अधिकाऱ्यांना यासंबंधात विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच हातभट्टीच्या दारूविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.