बायोटॉयलेट प्रकल्पाला मिळणार गती
By Admin | Published: March 7, 2017 02:01 AM2017-03-07T02:01:14+5:302017-03-07T02:01:14+5:30
रेल्वे अर्थसंकल्पात २०१९ पर्यंत देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्याची घोषणा करण्यात आली.
मोतीबागेत रेल्वेचा पायलट प्रकल्प : पुढील वर्षी तयार होतील तीन हजार बायोटॉयलेट
नागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात २०१९ पर्यंत देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे मोतीबाग बायोटॉयलेट प्रकल्पाला गती वाढविण्याचे वेध लागले आहे. यापूर्वीसुद्धा या प्रकल्पाची क्षमता वाढविण्याची तयारी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दाखविली होती. परंतु त्याबाबत पुढे काहीच होऊ शकले नाही. अर्थसंकल्पातील घोषणेमुळे प्रकल्पाची गती वाढणार असून, पुढील वर्षी या प्रकल्पात तीन हजार बायोटॉयलेट तयार करण्यात येणार आहेत.
मोतीबागच्या बायोटॉयलेट प्रकल्पात बायोटॉयलेटसाठी लागणाऱ्या पाण्यात इनॉक्युलम बॅक्टेरियाची निर्मिती केली जाते. या प्लॅन्टची क्षमता प्रति दिवस ५०० लिटर पाण्याची आहे. २०१४-१५ या वर्षात प्रकल्प सुरू झाला, मात्र प्रत्यक्षात २०१५-१६ यावर्षी कामाला सुरुवात झाली.
पहिल्या वर्षी मोतीबाग प्रकल्पातून ६१० बायोटॉयलेट तयार झाले. मध्य रेल्वेच्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा येथील बायोटॉयलेट लावण्यात आले. तत्पूर्वी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतही काही महत्त्वपूर्ण गाड्यात बायोटॉयलेट लावण्यात आले असले तरी त्यांची संख्या अतिशय कमी आहे. भारतीय रेल्वेचा हा देशातील एकमेव पायलट प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी दपूम रेल्वे प्रशासनाने आग्रहाची भूमिका घेतली होती. दपूम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी या प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ करण्याची तयारी दर्शवून या प्रकल्पातील २५०० बायोटॉयलेट विविध रेल्वे झोनमधील गाड्याात लावले. पुढील वर्षी तीन हजार बायोटॉयलेट निर्मितीचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लावण्यासाठी वर्षाला अडीच लाख बायोटॉयलेटची गरज आहे. या प्रकल्पातून सध्या २५०० बायोटॉयलेटची निर्मिती होत आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची उत्पादनक्षमता फारच कमी आहे. त्यामुळे रेल्वे खासगी तत्त्वावर बायोटॉयलेट विकत घेत आहे. मोतीबाग प्रकल्पाची क्षमता वाढल्यास लवकरच देशातील सर्व रेल्वेगाड्यात बायोटॉयलेट लागणार आहेत. (प्रतिनिधी)
अशी आहे प्रक्रिया
प्रकल्पातील साठवणूक केलेल्या पाण्यात इनॉक्युलम बॅक्टेरियाची निर्मिती होते. हे पाणी लिटर प्रमाणे मागेल त्या रेल्वेला पाठविले जाते. चौकोनी आकाराच्या डब्यात हे पाणी असलेली टाकी रेल्वेतील शौचालयाखाली लावली जाते. मानवी मलमूत्र या टाकीत साचते. मात्र या टाकीत असलेले इनॉक्युलम बॅक्टेरिया यातील मल नष्ट करून त्याचे पाण्यात रूपांतर करतात. बॅक्टेरियाने तयार केलेल्या पाण्याची पातळी वाढली की ते बाहेर पडत राहते. त्यामुळे टाकीत केवळ पाणीच उरते. बंद डब्यात हे बॅक्टेरिया दोन महिन्यापर्यंत जिवंत राहू शकतात.