भूसंपादन प्रक्रियेला वेग - एकूण ७८ जागांवर मार्किंग
By admin | Published: April 2, 2015 02:19 AM2015-04-02T02:19:22+5:302015-04-02T02:19:22+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांआधीच दोन्ही मार्गावर भूसंपादन करण्यात येणाऱ्या ७८ जागांवर मार्किंग (३.५ हेक्टर) केले आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांआधीच दोन्ही मार्गावर भूसंपादन करण्यात येणाऱ्या ७८ जागांवर मार्किंग (३.५ हेक्टर) केले आहे. या जागांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविली आहे. मध्यंतरी शासकीय सुट्या आणि कामाच्या ताणामुळे नोटिसा देण्याची प्रक्रिया मंदावली होती, पण आता त्याला वेग आला आहे. भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला किंवा टीडीएस मालकांना देण्यात येणार आहे. जागेनुसार दरनिश्चिती करण्यात आली आहे. भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याची यादीही तयार झाली आहे. शासकीय जागा ताब्यात घेताना अडचणी येणार नाही, पण खासगी जमिनीसंदर्भात शासनासमोर अनेक अडचणी येणार आहेत. मोबदल्यासाठी काही जमिनी न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची भीती आहे. पण त्यावर तातडीने तोडगा काढून मेट्रो रेल्वेच्या कामांना गती देण्याचे धोरण आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित हे तीन दिवसानंतर नागपुरात येणार असून काही गुड न्यूज देण्याचे सूतोवाच त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
शासकीय कार्यालयांना नोटीस
भूसंपादन प्रक्रियेंतर्गत शासनाने पटवर्धन हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, पोलिस क्वॉर्टर, जलप्रदाय कार्यालय, मॉरिस कॉलेजचे मैदान, होमगार्डची जागा, फॉरेन्सिक प्रयोगशाळा, शिक्षण उपसंचालक कार्यालयांसह पटवर्धन हायस्कूलच्या बाजूकडील तीन कार्यालयांना नोटीस दिल्या आहेत. शासकीय जागा ताब्यात घेण्यासाठी काहीच अडचणी येणार नाही, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
न्यायालयीन प्रक्रिया नकोच
खासगी जमिनीचे भूसंपादन करताना न्यायालयीन प्रक्रियेला फाटा देण्यात येणार आहे.जागेच्या अडथळ्यामुळे काही मार्गावर बदल होऊ शकतात. शिवाय १९ स्थानके असलेल्या पूर्व-पश्चिम मार्गावर लोकमान्य नगर मेट्रो डेपोसाठी हिंगणा मार्गावरील एसआरपीएफच्या फायरिंग रेंजच्या २६.७ हेक्टर जमिनीचे हस्तांतरण लवकरच होणार आहे. या जागेसाठी शासनाने मान्यता दिल्याची माहिती आहे.