सेटिंगच्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या औरंगाबादच्या स्क्वॅश स्पर्धेचा रेकॉर्ड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:17 AM2017-12-06T11:17:04+5:302017-12-06T11:18:56+5:30
‘सेटिंग’च्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेचा संपूर्ण रेकॉर्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ताब्यात घेतला. ही स्पर्धा औरंगाबाद येथे नुकतीच पार पडली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : ‘सेटिंग’च्या आरोपामुळे वादग्रस्त ठरलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेचा संपूर्ण रेकॉर्ड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ताब्यात घेतला. ही स्पर्धा औरंगाबाद येथे नुकतीच पार पडली.
राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार हा रेकॉर्ड सादर केला होता. स्पर्धेत सहभागी खेळाडू आरब जांभुळकरचे वडील अशोक जांभुळकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्पर्धेत ‘सेटिंग’ झाल्याचा आरोप केला आहे. स्पर्धेत पहिल्या चार विजेत्यांसाठी सामने खेळविण्यात आले, पण औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक आर. डी. महादवाड यांचा मुलगा रितेश महादवाड याला सामना न खेळविताच पाचवा विजेता ठरविण्यात आले. आरबने पाचवा विजेता ठरविण्यासाठी सामना खेळविण्याची विनंती आयोजकांना केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
याचिकाकर्त्याने स्पर्धेतील सामन्यांच्या रचनेवरही आक्षेप घेतला आहे. विशिष्ट खेळाडूला कसा लाभ होईल याचा विचार करून सामने निश्चित करण्यात आले, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेतील पहिल्या पाच खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळणार होता. या वादामुळे न्यायालयाने रितेशला राष्ट्रीय स्पर्धेत खेळविण्यास मनाई केली आहे. तसेच, स्पर्धा मंगळवारपासून सुरू झाल्याने व या प्रकरणावर निर्णय झाला नसल्यामुळे आरबचीही संधी हुकली आहे. परंतु, स्पर्धेतील ‘सेटिंग’ सिद्ध झाल्यास आरबला भरपाई मिळवून देण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत.
याप्रकरणावर आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. जे. एम. गांधी तर शासनातर्फे अॅड. नितीन रोडे यांनी बाजू मांडली.