नागपुरात अभियंत्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:37 PM2018-02-23T23:37:49+5:302018-02-23T23:38:05+5:30

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास आणि त्यांच्या हेकडपणामुळे झालेली आर्थिक कोंडी असह्य झाल्याने एका तरुण अभियंत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

Suicide by consuming poison a young engineer in Nagpur | नागपुरात अभियंत्याची विष प्राशन करून आत्महत्या

नागपुरात अभियंत्याची विष प्राशन करून आत्महत्या

Next
ठळक मुद्देबीएसएनएल अधिकाऱ्यांचा हेकडपणा : आर्थिक कोंडीमुळे नैराश्य : कारमध्येच घेतले विष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास आणि त्यांच्या हेकडपणामुळे झालेली आर्थिक कोंडी असह्य झाल्याने एका तरुण अभियंत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. आनंद दिनेश बाबरिया (वय ३०) असे मृताचे नाव आहे. तो गिट्टीखदानमधील हजारी पहाड भागात राहत होता.
केमिकल इंजिनिअर असलेल्या आनंदच्या कुटुंबात आई आणि अमित नामक भाऊ आहे. आनंद आणि अमित हे दोघे बीएसएनएलसह अन्य शासकीय विभागाच्या कामाचे कंत्राट घेतात. त्यांनी येथील बीएसएनएलच्या केबल लाईनचे मोठे कंत्राट घेतले होते. काम सुरू असताना बीएसएनएलने हे कंत्राट रद्द केले. मात्र, झालेल्या कामाचे ९० लाख रुपये आनंद यांना घ्यायचे होते. त्यासाठी आनंदचा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत वाद सुरू होता. प्रकरण न्यायालयात गेले होते. तेथून ४२ लाख रुपये आनंद यांना देण्याचा आदेश बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे समजते. मात्र, अधिकारी ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते.
दोन महिन्यांपूर्वी आनंदचा भाऊ अमित पत्नी आणि आईसोबत दिल्लीत राहायला गेला होता. काही दिवसानंतर आनंदसुद्धा दिल्लीत गेला. मात्र, बीएसएनएलकडून रक्कम घ्यायची असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच तो नागपुरात आला होता. संबंधित अधिकाऱ्यांच्या कक्षात तो चकरा मारत होता आणि अधिकाऱ्यांकडून त्याला टाळण्यासोबतच अपमानास्पद वागणूक मिळत होती. यामुळे आर्थिक कोंडी झाल्याने तो प्रचंड तणावात आला होता. याच अवस्थेतून त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता तो आपल्या घरून कारने बाहेर पडला. त्याने शून्य माईलजवळ बीएसएनएलच्या कार्यालयालगत आपली कार उभी केली. येथे त्याने विष प्राशन केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, बरेच वेळेपासून कार उभी असल्याने एकाने कारमध्ये डोकावले असता कारमध्ये तरुण पडून दिसला अन् त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून सीताबर्डी पोलिसांना कळविले. पोलिसांनी कारजवळ जाऊन आनंदला बाहेर काढले. त्याला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आनंदजवळ आणि कारमध्ये आढळलेल्या मोबाईल तसेच अन्य कागदपत्रावरून त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मित्र आणि नातेवाईकांना कळविले.
मित्रांना जबर धक्का
दरम्यान, आनदंच्या आत्महत्येचे वृत्त पसरताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्याचे स्थानिक नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येत सकाळपासूनच मेयो आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात गर्दी करून होते. दोन दिवसांपूर्वी एका समारंभात आनंदने त्याच्या मित्रमंडळीसोबत आनंदोत्सव साजरा केला होता. त्यावेळी त्याने बीएसएनएलच्या तीन अधिकाºयांकडून प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास दिला जात असल्याची माहिती मित्रांना दिली. आपली रक्कम अडकवून ठेवतानाच ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आर्थिक त्रास देत असल्याचेही सांगितले होते, असे समजते. तो व्यथित होता. मात्र, आनंद आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेल, अशी कुणी कल्पनाच केली नव्हती. त्याच्या आत्महत्येमुळे त्याच्या मित्रांनाही जबर मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान, रात्री आनंदचे दिल्लीतील नातेवाईकही नागपुरात पोहचल्याची माहिती आहे.
सुसाईड नोटमध्ये अधिकाऱ्यांना दोष
आनंदने त्याच्या एमएच ३१. ईए ३५२३ क्रमांकाच्या स्वीफ्ट कारमध्ये विष घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली. त्याने आत्मघातासाठी भावाची माफी मागितली असून, आपल्या आत्महत्येला बीएसएनएलचे विभागीय अभियंता वासनिक, विभागीय अभियंता गाडे आणि जेटीओ अमितकुमार धोटे यांना जबाबदार धरले आहे. आनंदने या तिघांना त्यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळे आपण आत्महत्या करणार, असा इशारादेखील दिला होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी प्राथमिक चौकशीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी या तिघांवर आनंदला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल होऊ शकतो, असे संकेत सीताबर्डी पोलिसांकडून मिळाले. आनंदने मृत्यूपूर्वी त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचा व्हिडीओ बनविल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र आम्हाला तसा व्हिडीओ मिळाला नसल्याचे सांगितले.

 

 

Web Title: Suicide by consuming poison a young engineer in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.