ठाकरे गटाचे सुरेश साखरे बंडखोरीच्या पवित्र्यात, रामटेकची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे नाराज
By कमलेश वानखेडे | Published: March 26, 2024 07:24 PM2024-03-26T19:24:26+5:302024-03-26T19:25:09+5:30
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन केला तरच आपण विचार करू, असे सांगत त्यांनी माघारीची सोय देखील करुन ठेवली आहे.
नागपूर : रामटेक लोकसभेची जागा काँग्रेसला सोडण्यात आल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पूर्व विदर्भ संघटनप्रमुख सुरेश साखरे नाराज आहेत. साखरे हे बंडखोरीच्या पवित्र्यात असून बुधवारी उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन केला तरच आपण विचार करू, असे सांगत त्यांनी माघारीची सोय देखील करकून ठेवली आहे.
रामटेक लोकसभेत काँग्रेस व शिवसेनेतच सामना व्हायचा. गेल्या दोन टर्मपासून ही जागा शिवसेनेने जिंकली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे यवतमाळ-वाशीमच्या दौऱ्यावर आले असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली व ही जागा शिवसेनेनेच लढावी, असा आग्रह धरला.
मात्र, जागा काँग्रेसला सोडण्यात आल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. सुरेश साखरे हे बसपाचे प्रदेशाध्यक्ष होते. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढले आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. साखरे यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. आता पक्षप्रमुख त्यांची समजूत काढतात का, याकडे काँग्रेसजणांचे लक्ष लागले आहे.