वाहतूक शाखेचे पोलीस करताहेत रेकॉर्डिंग
By Admin | Published: September 20, 2016 02:34 AM2016-09-20T02:34:27+5:302016-09-20T02:34:27+5:30
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणारे पोलीस खाबुगिरीच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरत
आरोप होऊ नये म्हणून खबरदारी : वाहनचालकांनो सावधान !
नागपूर : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणारे पोलीस खाबुगिरीच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरत असल्याचे पाहून आरोप टाळण्यासाठी त्यांना आता मोबाईलने रेकॉर्डिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या आणि नंतर पोलिसांशी वाद घालणाऱ्या वाहनचालकाची रेकॉर्डिंग केली जात आहे. या सबळ पुराव्याच्या आधारे वाहनचालकावर कडक कारवाई होऊ शकते.
वाहतूक शाखेचे पोलीस कारवाईपेक्षा आरोपांमुळेच वर्षभर चर्चेत राहतात. पैसे दिले नाहीत म्हणून वाद घातला, कारवाई केली, मारहाण केली, खोटी तक्रार करून गुन्हा नोंदविला, असे हे आरोप असतात. अनेक प्रकरणात हे आरोप खरेही असतात. वाहनचालकाला थांबवल्यानंतर त्याचा खिसा हलका करण्याचाच वाहतूक शाखेच्या पोलिसांचा प्रयत्न असतो.
वाहनचालकांशी सौजन्याने वागा
ड्रंक न ड्राईव्हच्या बहुतांश प्रकरणात वाहनचालकासोबत पोलिसांची बाचाबाची होते. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी प्रकाश बारंगे नामक वाहतूक शाखेच्या हवालदारावर सूर्यकांत व्यास याने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली. पुन्हा एकदा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा कारभार चर्चेला आला. तो लक्षात घेत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. वाहनचालकांशी वाद घालू नका, सौजन्याने वागा, असे सांगितले आहे. वाहनचालक वाद घालत असेल तर त्याचे मोबाईलने रेकॉर्डिंग करा. नंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल असेही उपायुक्त पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता वाहतूक शाखेचे पोलीस चौकाचौकात कारवाई करतानाच मोबाईलने रेकॉर्डिंग करताना दिसत आहेत.