उपराजधानीत होणार दोन सिंथेटिक ट्रॅक

By admin | Published: March 18, 2015 02:53 AM2015-03-18T02:53:08+5:302015-03-18T02:53:08+5:30

उपराजधानीतील प्रतिभावान धावपटू वर्षानुवर्षे ‘सिंथेटिक ट्रॅक’च्या प्रतीक्षेत आहेत. दरवेळी आशेचा किरण पल्लवित होतो आणि अखेर पदरी पडते

Two Synthetic Tracks to be Organized | उपराजधानीत होणार दोन सिंथेटिक ट्रॅक

उपराजधानीत होणार दोन सिंथेटिक ट्रॅक

Next

नागपूर : उपराजधानीतील प्रतिभावान धावपटू वर्षानुवर्षे ‘सिंथेटिक ट्रॅक’च्या प्रतीक्षेत आहेत. दरवेळी आशेचा किरण पल्लवित होतो आणि अखेर पदरी पडते ती निराशाच! पण आता या धावपटूंचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. विशेष असे की एक नव्हे तर दोन सिंथेटिक ट्रॅक आकारास येणार आहेत.
मानकापूर स्थित विभागीय क्रीडा संकुल परिसरात लवकरच सिंथेटिक ट्रॅकचे काम सुरू होईल. दुसरीकडे अमरावती रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सिंथेटिक ट्रॅकसाठी क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाने देखील प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.
‘आॅरेंजसिटी’ अशी ख्याती असलेल्या या शहराने गेल्या काही दशकात देशाला अनेक मध्यम आणि लांब पल्ल्याचे धावपटू दिले. धावण्याच्या व सरावाच्या पुरेशा सुविधा नसताना या धावपटूंनी मेहनतीच्या तसेच प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरीचा ठसा उमटविला.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवर होत असल्याने या खेळाडूंना परिस्थितीशी सांगड घालताना फार त्रास जाणवतो. खेळाडूंना होत असलेल्या यातना वारंवार शासन दरबारी ठेवण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्यक्षात सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती ही कुठल्या ना कुठल्या कारणांनी रखडत राहीली. कधी आर्थिक तरतुदीचा अभाव तर कधी यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या रेतीच्या अनुपलब्धतेचे कारण पुढे करीत वेळकाढूपणा होत राहिला.
विभागीय क्रीडा संकुल परिसरात १७ कोटी रुपये खर्चाच्या ट्रॅकचे भूमिपूजन तसे २०११ ला झले. १८ महिन्यात ट्रॅक पूर्ण करण्याचा करार होता. पण ट्रॅक बनविणारी दिल्ली येथील ‘इन्फ्राटेक प्रा. लि.’ ने कामाकडे दुर्लक्ष केल्याने संकुल समितीला करार मोडीत काढावा लागला. नंतर नागपूर सुधार प्रन्यासकडे हे काम सोपविण्यात आले. रेती उपलब्ध नसल्यामुळे नासुप्र देखील हे काम सुरू करू शकले नाही. नागपूर विभागाचे प्रभारी क्रीडा संचालक विजय संतान यांनी दिलेल्या माहितीनुसार,‘ रेती आणि मुरुम उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे कामाला लवकरच सुरुवात होईल. यासाठी निविदा काढण्यात येतील व काम सुरू करण्यात येईल.
ट्रॅकसाठी आवश्यक अडीचशे ट्रक रेती येऊन पडली आहे. शिवाय पैशाची अडचण नसल्याने विनाअडथळा काम सुरू करण्यास हरकत नाही.’ (क्रीडा प्रतिनिधी)

विद्यापीठ परिसरात दुसरा ट्रॅक
धावपटूंसाठी दुसरा ट्रॅक विद्यापीठ मैदानावर आकारास येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळणाऱ्या रकमेतून ट्रॅक तयार होईल. यासंदर्भात प्रस्ताव देखील पाठविण्यात आल्याची माहिती आहे. विद्यापीठाच्या बजेटमध्ये सहा कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यपालांकडून हिरवी झेंडी मिळताच प्रत्यक्ष काम सुरू होईल. आगामी दोन वर्षांत कुठला ट्रॅक आधी तयार होतो आणि धावपटू सुखावतील याची आता उत्सुकता लागली आहे.

Web Title: Two Synthetic Tracks to be Organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.