नागपुरात मतिमंद युवकासोबत अनैसर्गिक कृत्य : एएसआयला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:37 AM2017-12-14T00:37:31+5:302017-12-14T00:43:01+5:30
मतिमंद युवकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या एका सहायक फौजदाराला (एएसआय) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : मतिमंद युवकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या एका सहायक फौजदाराला (एएसआय) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अनंता मधुकर रितोंडे (वय ५२) असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तो पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे.
मतिमंद मुलगा एमआयडीसीतील एकात्मतानगरात राहतो. त्याच्या आईचे निधन झाले तर त्याचे वडील वर्षभरापूर्वी यवतमाळला निघून गेले. त्याचे काका त्याचा सांभाळ करतात. मतिमंद असल्यामुळे तो इकडे तिकडे भटकत असतो. मंगळवारी तो दुपारपासून बेपत्ता होता. त्याच्या काकांनी त्याचा इकडे तिकडे शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही. पहाटे ५ च्या सुमारास तो घरी परतला. त्यानंतर काकांनी त्याला सकाळी विचारणा केली असता त्याने अनैसर्गिक कृत्याची माहिती दिली. एका मोटरसायकलवाल्याची त्याने माहिती दिली. घटनास्थळही दाखवले. त्यामुळे काका आणि परिसरातील काही महिला पुरुषांनी तिकडे जाऊन चौकशी केली. एकाने हा ज्या व्यक्तीच्या मोटरसायकलवर दिसला त्या मोटरसायकलचा क्रमांक सांगून तो पोलिसासारखा दिसत होता,असे सांगितले. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या भावना अधिकच तीव्र झाल्या. सकाळी या भागातील नागरिक मुलाला घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी पोलिसांना मोटरसायकलचा क्रमांक दिला. त्या आधारे पोलिसांनी रितोंडेला ताब्यात घेतले. रितोंडेने मात्र इन्कार केला. त्यामुळे पोलिसांनी पीडित मुलासह त्याला घटनास्थळाकडे नेले. त्या भागातील नागरिकांकडे चौकशी केली असता मतिमंद मुलासोबत हीच व्यक्ती होती,असे सांगितले.
यापूर्वीही केले तोंड काळे ?
रितोंडेने आपण निर्दोष असून, दुचाकीवर बसवून त्याला आपण मंगळवारीच दुपारीच सोडून दिल्याचे त्याने एमआयडीसी पोलिसांना सांगितले. मात्र, घटनास्थळ परिसरात राहणाऱ्या अनेकांनी रितोंडेला मतिमंद मुलासोबत ३० नोव्हेंबर आणि ३ डिसेंबरलाही पाहिले. त्यामुळे त्यानेच गैरकृत्य केले असावे, असा अंदाजवजा आरोप संतप्त नागरिकांनी केला. जमावाचा रोष पाहून परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळाल्याने एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी रितोंडेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.