तपासणीदरम्यान विदर्भात पाऊण कोटीची रोकड पकडली
By admin | Published: September 30, 2014 12:34 AM2014-09-30T00:34:00+5:302014-09-30T00:34:00+5:30
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणीदरम्यान विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी तब्बल पाऊण कोटी रुपयांची रोकड आढळून आल्याची माहिती आहे.
निवडणूक पथकाची कारवाई : अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील घटना
नागपूर : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणीदरम्यान विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी तब्बल पाऊण कोटी रुपयांची रोकड आढळून आल्याची माहिती आहे. मात्र अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवारी नाकाबंदीदरम्यान दोन वाहनांत आढळून आलेली ४० लाखांची रक्कम स्थानिक बँकेची असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सोडून दिली.
सोमवारी दुपारी अचलपूर नाक्यावर अमरावतीकडून परतवाड्याकडे जाणाऱ्या एम.एच.२७ ऐ.जी. ८७२६ या वाहनात पोलिसांना ५ लाख ८९ हजार ५०० रुपये असल्याचे आढळून आले. ही रक्कम कंत्राटदार अहमद नासीर अहमद रऊफ यांच्याकडे होती. पोलिसांनी त्याला उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात नेले होते. पकडण्यात आलेली रक्कम सुसर्दा येथील समाज मंदिराच्या बांधकामासाठी आणली असल्याचे समजते. वृत्त लिहिस्तोवर चौकशी सुरु होती.
तसेच अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवारी नाकाबंदी दरम्यान दोन वाहनांत ४० लाखांची रक्कम आढळून आली मात्र ती रक्कम स्थानिक बँकेची असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सोडून दिली. सोमवारी अर्जुननगर टी-पाइंटवर पोलिसांनी नाकबंदी करुन वाहनाची तपासणी केली. यावेळी एमएच-२७-बीई- ३३९९ या वाहनात शारदा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेची ३० लाखांची रोकड पोलिसांना आढळून आली. पोलिसांच्या चौकशीत ही रोकड बँक शाखेची असल्याचे स्पष्ट झाल्याने वाहन रोकडसह सोडून देण्यात आले. त्याचप्रमाणे इको बँकेच्या एम.एच.२७-ए.सी. ८५८३ या वाहनात १० लाखांची रक्कम आढळून आली. पोलिसांनी रक्कमेची शहानिशा करुन त्या वाहनाला सोडून दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर- चंद्रपूर मार्गावरील वरोरा तालुक्यातील खांबाडा गावाजवळ निवडणूक तपासणी पथकाने एका वाहनातील वीस लाख रुपयांची रोकड जप्त केली. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागपूर- चंद्रपूर मार्गावरील खांबाडा गावाजवळील तपासणी पथकाने एमएच एसी २४०३ या वाहनाची तपासणी केली. वाहनाच्या मागील डिक्कीमध्ये ठेवलेल्या काळ्या बॅगमध्ये २० लाख रुपये आढळून आले. ही रोख वाहनामध्ये बसलेल्या इंदोर येथील राजेश कल्यानमल गर्ग यांची असल्याची कबुली निवडणूक पथकाला दिली. सदर रक्कम टोल टॅक्सच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची तसेच रस्ता दुरुस्तीकरिता लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीबाबत असल्याचे राजेश गर्ग यांनी आपल्या बयाणात नमूद केले आहे. निवडणूक पथकाने वाहन चालक महेश तुळशिराम धकाते रा. जयताडा नागपूर याचेही बयान नोंदविले आहे. रक्कमेबाबत निवडणूक पथकाला घटना स्थळी कागदपत्र सादर करुन शकले नसल्याने सदर रक्कम वरोरा येथील कोषागारामध्ये जमा करण्यात आली आहे. रकमेची तपासणी करण्याकरिता आयकर विभागाचे अधिकारी वरोरा शहरात दाखल झाले आहे.
तिकडे यवतमाळ जिल्ह्यात पिंपळगाव चेकपोस्टवर बसमधील एका प्रवाशाजवळ तब्बल १० लाख ३० हजार ७०० रुपये रोख आढळून आले. ही रक्कम आर्णी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली. ही रक्कम नेमकी कोणत्या कामासाठी नेली जात होती, हे मात्र कळू शकले नाही.
मोहंमद जुबेर शेख रा. कुरूम ता. मूर्तिजापूर जि. अकोला असे रोकड आढळलेल्या तरूणाचे नाव आहे. तो अदिलाबाद येथून नांदगाव येथे जात होता. त्यासाठी हैदराबाद-नागपूर बसमध्ये प्रवास करीत होता. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर सोमवारी वाहनांची तपासणी सुरू असताना या बसची तपासणी करण्यात आली त्यावेळी मोहंमद जबेर शेख जवळ १० लाख ३० हजार ७०० रुपये रोख आढळून आले.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक एस.बी. खंडारे, बळीराम शुक्ला, मंडळ अधिकारी चांदेकर यांनी केली. ही रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी जात होती हे मात्र कळू शकले नाही. विशेष म्हणजे, रविवारी वाहनांची तपासणी सुरू असताना दोन गांजा तस्कारांना अटक करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)