विदर्भात सर्वदूर पावसाची झड; पिकांचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 09:30 AM2019-01-25T09:30:05+5:302019-01-25T09:35:09+5:30
शुक्रवारी मध्यरात्रीपासून विदर्भात सर्वदूर अवकाळी पावसाने झड लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शुक्रवारी मध्यरात्रीपासून विदर्भात सर्वदूर अवकाळी पावसाने झड लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकासह भाजीपाल्यालाही याचा फटका बसला आहे. भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारा पडल्याने पीक भुईसपाट झाले आहे. गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री १२ पासूनच नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी तुरळक व मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मेघगर्जनांसह कोसळलेल्या या पावसासोबतच गारांचाही वर्षाव झाला. पहाटे ३ च्या सुमारास पावसाचा जोर अधिक होता. भंडारा जिल्ह्यात गारांचाही वर्षाव झाला. कापून ठेवलेल्या तुरीच्या गंजी पावसात भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच धान, कापूस सोयाबीन व चणा या पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. मकर संक्रांतीनंतर दुपारी गरम होत असतानाच काल व आज अवचित कोसळलेल्या या पावसाने थंडीचा कडाकाही वाढला आहे.