विजय रत्न सुंदर सूरीश्वरजींचा चातुर्मास आजही आठवणीत
By admin | Published: January 26, 2017 02:48 AM2017-01-26T02:48:20+5:302017-01-26T02:48:20+5:30
आचार्य विजय रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांचे प्रेरक उद्बोधन अद्यापही नागपूरकरांच्या आठवणीत आहे
नागपूर : आचार्य विजय रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांचे प्रेरक उद्बोधन अद्यापही नागपूरकरांच्या आठवणीत आहे. २०१२ साली चातुर्मासादरम्यान त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आयुष्याला खऱ्या अर्थाने सत्कारणी लावण्यासंदर्भातील बाबींवर प्रकाश टाकला होता. जाती, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या सान्निध्यात अक्षरश: प्रेरणासुमनांचा वर्षाव झाला. नागपुरातील चातुर्मासादरम्यानच्या उद्बोधनात आचार्यांनी शिक्षण व परमात्म्याच्या भक्तीवर भर दिला होता. २ जून २०१२ रोजी त्यांचे आगमन झाले तेव्हा शहरातील मान्यवर व जनता त्यांच्या स्वागतासाठी एकत्र आली होती.
प्रवचनाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या अमृतवाणीच्या धारा बरसल्या होत्या. देश आणि समाजहिताच्या कार्यांची अंमलबजावणी करीत असताना आपण काही मुद्यांवर गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. वेळेचे महत्त्व विशद करीत असताना त्यांनी ‘व्हिजन’च्या मुद्यावर भर दिला होता. संपत्तीच्या नावाखाली आपण पैसे जमा करण्यासाठी झटतो, मात्र वेळ सातत्याने सरत असते.
त्या क्षणांना आपल्या सत्कृत्यांनी जतन करण्यासाठी उपाय करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे ते म्हणाले होते.(प्रतिनिधी)
मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे
प्रत्येक व्यक्ती वस्तू वाढविण्यासाठी आणि सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे व्यक्तीचा अहंकार वाढतो, मात्र समाधान व शांती लाभत नाही. जितका अहंकार, तितकी अशांती असते.
मनुष्याच्या आयुष्यात संबंधांना फार महत्त्व आहे. संबंध खराब होऊ देऊ नका. जर खराब झाले तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. अहंकार हा संबंधांचा सर्वात मोठा शत्रू आहे. संबंधांचा कधीच स्वाभाविक मृत्यू होत नाही, त्यांची हत्याच होते.
आपल्याला स्वत:चे अधिकार व दुसऱ्यांचे कर्तव्य जास्त आठवणीत राहतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी संघर्ष, अशांती व वादाची स्थिती निर्माण होत आहे. संपत्ती जमा करण्याचा व अधिकार गाजविण्याचा नशा, ही संबंध बिघडविण्याचे सर्वात मोठे कारण बनते.
कुठलाही कैदी शिक्षा किंवा हेटाळणीतून नाही, तर प्रेमाने बदलतो व सुधारतो. याचप्रकारे समाज व आयुष्यात कुठल्याही व्यक्तीबाबत हेटाळणीची प्रवृत्ती ही आपल्या लोकांसोबतच संबंध बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरते.
साधना, समाधी आणि समता ठेवणारा व्यक्ती साधू बनतो, असा समज बनला आहे. प्रत्यक्षात दुसऱ्यांना मदत करणारा खऱ्या अर्थाने साधू म्हणवून घेण्याचा अधिकारी आहे.