संसर्गप्रसारास प्रतिबंध करण्यासाठी हात धुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 08:15 PM2018-03-05T20:15:59+5:302018-03-05T20:16:20+5:30
इस्पितळांमध्ये संसर्गप्रसारास प्रतिबंध करण्याचा सर्वाधिक परिणामकारक मार्ग म्हणजे योग्यप्रकारे हात धुणे हा आहे. जर तुम्ही रुग्ण असाल तर तुमचे मित्र, कुटुंबिय तसेच आरोग्य सेवा प्रदाते यांना आपापले हात धुण्याची आठवण करुन द्या, असा सल्ला डॉ. समीर पलतेवार यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इस्पितळांमध्ये संसर्गप्रसारास प्रतिबंध करण्याचा सर्वाधिक परिणामकारक मार्ग म्हणजे योग्यप्रकारे हात धुणे हा आहे. जर तुम्ही रुग्ण असाल तर तुमचे मित्र, कुटुंबिय तसेच आरोग्य सेवा प्रदाते यांना आपापले हात धुण्याची आठवण करुन द्या, असा सल्ला डॉ. समीर पलतेवार यांनी दिला.
संसर्ग नियंत्रण सप्ताला ५ मार्चपासून सुरूवात झाली. यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी डॉ. अतूल राजकोंडावार, डॉ. अश्विनी तायडे व डॉ. अनघा देशमुख उपस्थित होत्या. डॉ. पलतेवार म्हणाले, भारतात दरवर्षी इस्पितळामध्ये संसर्ग फैलावल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात येतो. या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी संसर्ग नियंत्रण सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. हे सहावे वर्ष आहे. ५ ते ११ मार्चपर्यंत चालणाºया या सप्ताहात प्रति जैविक प्रतिरोध, हवेतून पसरणारे संक्रमण, स्पर्शाने होणारे संक्रमण टाळण्यासाठी घेण्यात येणारी दक्षता, जंतू नाशके, निर्जंतुकीकरण, जैविक कचरा या सारख्या विषयांवर परिसंवाद, भित्ती पत्रक, रांगोळी स्पर्धा यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ७ मार्च रोजी प्रति जैविके जनजागृती या विषयावर झीरो माईल ते मेडिट्रीना इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सपर्यंत रॅली काढण्यात येईल. या रॅलीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हिरवी झेंडी दाखवतील, असेही ते म्हणाले.
विषाणूची प्रतिकार शक्ती वाढणे धोक्याचे
एकूण रुग्णांपैकी साधारण ५० टक्के रुग्णांना आवश्यक्ता नसतानाही प्रतिजैविक औषधांची मात्रा दिली जाते. त्यामुळे रुग्णांच्या शरीरातील विषाणूंची प्रतिकार शक्ती वाढते. काही रुग्णांना औषध सेवन केल्यावरही आराम मिळत नाही. हा धोका टाळण्यासाठी त्वरित प्रतिजैविक औषधांचे अनावश्यक वाटप टाळण्याची गरज आहे. सध्या नव्या प्रतिजैविक औषधांची निर्मिती बंद आहे. यामुळे प्रत्येकाने याचा वापर काळजीपूर्वक करणे, याची जनजागृती करणे व संक्रमण होणार याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असेही डॉ. पलतेवार म्हणाले.