सोमवारपासून सुरू होणारे नागपूरचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार
By यदू जोशी | Published: December 9, 2017 05:27 AM2017-12-09T05:27:22+5:302017-12-09T05:27:46+5:30
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे. शेतकºयांची कर्जमाफी, बोंडअळीने झालेले पिकांचे नुकसान, कायदा व सुव्यवस्था, खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे. शेतकºयांची कर्जमाफी, बोंडअळीने झालेले पिकांचे नुकसान, कायदा व सुव्यवस्था, खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा, समृद्धी महामार्ग, आयटी विभागाचा घोळ, शिक्षण खात्याचे काही निर्णय आदी मुद्यांवर विरोधक हल्लाबोल करतील,असे चित्र आहे. तर विरोधकांचे हल्ले अत्यंत आक्रमकपणे परतवून लावण्याची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखली आहे.
कर्जमाफीपासून विविध मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार गृहपाठ केला असून विरोधकांच्या संभाव्य आरोपांना परतवून लावण्यासाठी आकडेवारीसह सर्व दारूगोळा तयार ठेवला आहे. दुसरीकडे रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित चहापानावर विरोधक नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
१२ डिसेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे विधिमंडळावर शेतकºयांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद या मोर्चाचे नेतृत्व करतील. या मोर्चाने विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला तर त्याचे पडसाद अधिवेशनातही उमटतील. राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोल मार्चे काढून आधीच सरकारविरोधी वातावरण पेटविले आहे.
या अधिवेशनादरम्यान गुजरात निवडणुकीचा निकाल १८ डिसेंबरला लागणार असून त्या निकालाचे पडसादही अधिवेशनात उमटतील. भाजपाला विजय मिळाल्यास सरकार आत्मविश्वासाने कामकाज चालवेल, आणि फटका बसला तर विरोधक अधिक आक्रमक होतील.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे प्रसाद लाड विजयी होताना काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटल्याचे उघड झाल्याने विरोधकांवर नामुष्की ओढावली आहे. १२ तारखेच्या निमित्ताने एकत्र येत असलेले विरोधी पक्ष त्याच एकीने विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात आक्रमक होतील का यावर बरेच काही अवलंबून असेल. लाड यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-शिवसेना यांच्यात दिसलेली एकी अधिवेशनात दिसते का हाही औत्सुक्याचा विषय असेल.
गोंधळापेक्षा चर्चा करा, प्रत्येक
आरोपाचे उत्तर देतो : मुख्यमंत्री
विधिमंडळाच्या अधिवेशनात गोंधळ घालण्याकडेच विरोधकांचा कल दिसून आला आहे. यावेळी तरी त्यांनी चर्चा करावी म्हणजे त्यांच्या एकेक प्रश्नाचे सडेतोड उत्तर मी देईन, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आव्हान दिले. लोकमतशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकºयांची आजची अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच झाली अन् आज ते हल्लाबोल करायला निघाले आहेत. आम्ही राज्याच्या हितासाठी काय केले याची यादी तर आमच्याकडे आहेच पण त्यांच्या पापांचा हिशेबही आहे. तो आता सांगावाच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.
अपयशी सरकारला जाब
विचारणारच : राधाकृष्ण विखे पाटील
कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकºयांची
चेष्टा चालविली आहे. कायदा व सुव्यवस्था राज्यात राहिलेली नाही. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत असलेल्या फडणवीस सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,
असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, आमची कामगिरी दमदार असे सांगणाºया सरकारने राज्याच्या हितासाठी काय केले? या सरकारचा मी लाभार्थी
म्हणून जाहिरातबाजी केली पण सरकारी योजनांच्या अपयशाची पोलखोल आम्ही अधिवेशनात करू. १२ तारखेच्या मोर्चानंतर आम्ही सभागृहात सरकारविरुद्ध
मोर्चा उघडू.